गजानन गव्हाळे (वय- ३५) आणि उमा कपाटे (वय- ३०) असं आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचं नाव आहे. दोघंही हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण या गावातील रहिवासी होते. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. याच प्रेमसंबंधातून त्यांनी गावातून पळ काढला होता. पण आता वर्षभराने पुन्हा गावात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्यातील नात्याला विरोध केला. यातून प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय गजानन गव्हाळे आणि ३० वर्षीय उमा कपाटे दोघेही विवाहित होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्यात ओळख झाली. कालांतराने त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनाही सोबत राहायचं होतं. पण दोघंही विवाहित असल्याने त्यांच्या नात्याला विरोध होईल, याची कल्पना त्यांना आधीपासून होती. त्यामुळे दोघंही वर्षभरापूर्वी गावातून पळून गेले होते.
सोमवारी (०६ ऑक्टोबर) हे दोघे पुन्हा गावात परतले. मात्र, त्यांच्या या निर्णयाला आणि प्रेमसंबंधाला घरातील सदस्यांनी तीव्र विरोध केला. कुटुंबियांच्या विरोधानंतर, आपल्या प्रेमाला आता कोणताही आधार मिळणार नाही, या निराशेपोटी या दोघांनी टोकाचे पाऊल उचलले आणि विष प्राशन करून जीवन संपवले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे चिंचगव्हाणवर शोककळा पसरली आहे.