ही घटना सोमवारी रात्री शेळगाव येथील ग्रामपंचायत परिसरात घडली. संतोष माटलवार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मयत संतोष माटलवार हा त्याचा भाऊ आणि मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्याचवेळी गावातीलच एक अल्पवयीन मुलगा त्यांच्याजवळ आला. त्याने संतोषला 'तू माझ्या बहिणीच्या पाठीमागे लागू नकोस,' अशी धमकी दिली. यावेळी संतोषने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला.
advertisement
हा वाद वाढत गेल्यानंतर चिडलेल्या आरोपीने आपल्याजवळील धारदार चाकूने संतोष माटलवारच्या गळ्यावर आणि पाठीवर प्राणघातक वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे संतोष रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या भावाने आणि मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर संतोषला मृत घोषित केले.
सुरुवातीला किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे वाटले, परंतु मयत संतोषच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून या हत्येमागे बहिणीची छेडछाड केल्याचं कारण असल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर गुन्ह्याची नोंद देगलूर पोलिसांनी घेतली असून, त्यांनी तातडीने तपासाची चक्रं फिरवली आणि हत्येचा आरोप असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.