नाशिक: दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. महामार्गांवर मोठी कोंडी असून दुसरीकडे रेल्वेतही प्रवाशांची मोठी गर्दी आहे. मात्र, दुसरीकडे आपल्या गावी जाणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. नाशिकमध्ये रेल्वे एक्स्प्रेसमधून पडून तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून रकसोलकडे (बिहार) जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून नाशिक रोड रेल्वे स्थानका जवळ असलेल्या भागात तिघे युवक खाली पडल्याची भीषण दुर्घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमी युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
शनिवार रात्री नाशिक रोड रेल्वे स्थानकातून न थांबता लोकमान्य टिळक टर्मिनसहून रकसोल (बिहार) कडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून गाडी पुढे गेली. त्यानंतर ओढा रेल्वे स्थानकावरील स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे विभागाशी संपर्क साधून गाडी सुटल्यानंतर काही वेळात जेल रोड हनुमान मंदिरजवळील ढिकले नगर परिसरात तिघे युवक रेल्वेखाली पडले असल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी, पोलिस हवालदार भोळे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. भुसावळकडे जाणाऱ्या पटरीवरील किलोमीटर 190/1 ते 190/3 दरम्यान 30 ते 35 वयोगटातील दोन युवक मृतावस्थेत आढळले. तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला.
गंभीर असलेल्या युवकास तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गाडीतून पडून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे युवक सणासाठी गावी जात होते की बिहार निवडणुकीसाठी मतदानासाठी जात होते, याबाबतही तपास सुरू आहे.