नाशिक : नगरपंचायत आणि नगरपरिषदेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. मात्र नाशिकमध्ये भाजपला मोठ्या परभवाला सामोरे जावं लागलं. एकनाथ शिंदे यांनी 11 पैकी तब्बल 5 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष विजय झाले तर भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांना प्रत्येकी 3 नगराध्यक्षपदाच्या जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे.
advertisement
संकट मोचकांची जादू चालली नाही, भाजप बॅकफुटला
नाशिक जिल्ह्याची जबाबदारी ही भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांना नाशिक मध्ये अपयश आल्याचं दिसून आलं आहे. ऐन कुंभमेळ्यांच्या तोंडावर भाजपला मोठ्या परभवाला सामोरे जावे लागले आहे. राज्यभर देवेंद्र फडणवीस यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र त्या तुलनेत नाशिकमध्ये सभा कमी झाल्या. गिरीश महाजन यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्याचा जास्त फायदा होताना दिसून आला नाही.
एकनाथ शिंदे कसे सरस ठरले?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी कामगिरी केली. त्यामध्ये सर्वात महत्वाची त्र्यंबकेश्वर नगरपरिषद ठरली. त्याचं कारण आहे ते म्हणजे कुंभ मेळा. 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर हे महत्वाचे केंद्रस्थान आहे. भाजपने त्र्यंबकेश्वरमध्ये सत्ता आणण्यासाठी मोठी पराकष्टा केली मात्र त्यांना यश मिळाले नाही. तसेच एकनाथ शिंदे यांनी घेतलेली सभा देखील महत्वाची ठरली. दुसरीकडे इगतपुरी नगरपरिषदेतही शिंदेनी बाजी मारली. गिरीश महाजन यांनी विजय इंदुलकर यांना भाजपमध्ये घेतले मात्र त्याचा फरक जास्त जाणवला नाही.
आश्वासन ठरलं फायदेशीर
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारादरम्यान महाबळेश्वरनंतर इगतपुरीला थंड हवेचे ठिकाण म्हणून मान्यता देऊन पर्यटनाचा दर्जा देऊन प्रचंड रोजगार उपलब्ध करून देऊ.असं आश्वासन दिले तसेच आडवण येथे महिंद्रा कंपनीचा प्लँट आणत बेरोजगारी दूर करू असेही ते म्हणाले.
अजित पवारांची कमाल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भगूर नगरपरिषदेत मोठा विजय मिळवला आहे. भगूरमध्ये गेली 25 वर्षे शिवसेनेची सत्ता होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत बदल झाला. तर येवल्यातही छगन भुजबळ यांनी आपला गड राखला आहे. दुसरीकडे सिन्नर नगरपरिषदेतही राष्ट्रवादीने मोठं यश मिळवलं आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांनी भाजप विरोधात वादग्रस्त विधानही केले होते. मात्र त्याचा परिणाम जाणवला नाही. राष्ट्रवादीने सिन्नरमध्ये मोठं यश मिळवलं.भाजपनेही पक्षाच्या रूपाने सिन्नरमध्ये आपली मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र त्याचा फायदा त्यांना झाला नाही.
जिल्हानिहाय प्रमुख निकाल
1. भगूर : राष्ट्रवादी अजित पवार गट – प्रेरणा बलकवडे विजयी
2. पिंपळगाव बसवंत: भाजप – डॉ. मनोज बर्डे विजयी
3. सिन्नर: राष्ट्रवादी अजित पवार गट – विठ्ठलराजे उगले विजयी
4. ओझर: भाजप – अनिता घेगडमल विजयी
5. त्र्यंबकेश्वर: शिंदे शिवसेना – त्रिवेणी तुंगार विजयी
6. इगतपुरी: शिंदे शिवसेना – शालिनी खताळे विजयी
7. येवला: राष्ट्रवादी अजित पवार गट – राजेंद्र लोणारी विजयी (भुजबळ समर्थक)
8. मनमाड: शिंदे शिवसेना – बबलू पाटील विजयी
9. नांदगाव: शिंदे शिवसेना – सागर हिरे विजयी
10.सटाणा: शिंदे शिवसेना – हर्षदा पाटील विजयी
11. चांदवड: भाजप – वैभव बागुल विजयी
