तब्बल पावणेचार वर्षांपासून रखडलेली नाशिक महानगरपालिकेची निवडणूक अखेर निर्णायक वळणावर आली आहे. गुरुवारी (१५ जानेवारी) शहरात मतदान प्रक्रिया पार पडली असून आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे १२२ जागांपैकी तब्बल १५ प्रभागांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाल्याने निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
advertisement
१२२ जागांसाठी ७३५ उमेदवार रिंगणात
नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी ही निवडणूक झाली. यामध्ये एकूण ७३५ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. या निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक ३८ माजी नगरसेवक रिंगणात उतरले होते. त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाकडून ३० माजी नगरसेवक निवडणूक लढवत होते. एकूण ८७ माजी नगरसेवक पुन्हा एकदा मतदारांसमोर गेले असून, त्यातील सहा माजी नगरसेवक अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.
भाजप विरुद्ध शिंदेसेना थेट सामना
१२२ पैकी तब्बल ९६ जागांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये थेट लढत झाली. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली, तर शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट), रिपब्लिकन सेना युती तसेच महाविकास आघाडी यांनीही आपापली ताकद पणाला लावली. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासह तब्बल २०८ अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात होते.
