मुकेश शहाणे किंगमेकर, दीपक बडगुजर धक्का
या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा आणि हायव्होल्टेज सामना प्रभाग क्रमांक २९ मध्ये पाहायला मिळाला. या प्रभागातील ‘अ’ गटासाठी भाजपने आधी दीपक बडगुजर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, नंतर उमेदवारी बदलून मुकेश शहाणे यांना संधी देण्यात आली. एबी फॉर्म वेळेत न मिळाल्याने मुकेश शहाणे यांचा अधिकृत अर्ज बाद ठरला आणि त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. या प्रकारानंतर भाजपने शहाणे यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी शहाणे यांना उघड पाठिंबा दिल्याने ही लढत अधिकच रंगतदार बनली. अखेर अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या मुकेश शहाणे यांनी बाजी मारत विजय मिळवला.
advertisement
या विजयात मुकेश शहाणे यांनी भाजपचे उमेदवार दीपक बडगुजर यांचा पराभव केला. दीपक बडगुजर हे भाजपमध्ये आलेले माजी आमदार सुधाकर बडगुजर यांचे पुत्र आहेत. विशेष म्हणजे, स्वतः सुधाकर बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक २५ मधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला, मात्र त्यांच्या मुलाला पराभव स्वीकारावा लागला. मुकेश शहाणे यांना १४ हजार २८४ मते मिळाली. त्याच प्रभागातील उर्वरित तीन जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला. योगिता हिरे यांना १३,००९, छाया देवांग यांना ९,५४१ तर भूषण राणे यांना ९,१५६ मते मिळाली.
माजी महापौर अशोक मुर्तडक यांचा पराभव
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचा माजी उपमहापौर गुरमीत बग्गा यांनी पराभव केला. निवडणुकीपूर्वी मुर्तडक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आणि नंतर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही. माजी महापौर यतीन वाघ यांच्या पत्नी हितेश वाघ यांचा प्रभाग क्रमांक १३ मधून मनसेच्या मयुरी पवार यांनी पराभव केला. तसेच भाजपचे माजी उपमहापौर भिकूबाई बागुल यांचे नातू आणि ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांचे पुत्र मनीष बागुल यांनाही शिंदे सेनेचे प्रमोद पालवे यांनी पराभूत केले.
भाजपचे मिलिंद थोरात यांचा पराभव
दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वसंत गीते यांनी आपला राजकीय गड राखला. त्यांचे पुत्र आणि महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांनी भाजपचे मिलिंद थोरात यांचा पराभव केला. सुरुवातीच्या फेऱ्यांत प्रथमेश गीते पिछाडीवर होते, मात्र शेवटच्या फेऱ्यांत त्यांनी आघाडी घेत विजय मिळवला.
सीमा हिरेंना धक्का
भाजपच्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील आमदार सीमा हिरे यांनाही या निवडणुकीत मोठा धक्का बसला. प्रभाग क्रमांक ७ मधून त्यांचे दीर योगेश हिरे यांचा शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी पराभव केला. निवडणुकीपूर्वी आमदार हिरे यांची कन्या रश्मी बेंडाळे यांना घराणेशाहीच्या कारणावरून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता दीर योगेश हिरे यांच्या पराभवामुळे आमदार सीमा हिरे यांची राजकीय अडचण वाढल्याचे चित्र आहे.
