३ दिवसांपूर्वी एका 24 वर्षीय नरधमाने ३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची संतापजनक घटना मालेगावमधील डोंगराळे गावात समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. विजय संजय खैरनार असं या नराधम आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नातेवाईक आणि गावातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळी असून आरोपी तरुणांला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
डोंगराळे गावात ही घटना ३ दिवसांपूर्वी घडली होती. विजय संजय खैरनार या नराधमाने ३ वर्षांच्या लेकीवर अत्याचार केले आणि बिंग फुटू नये म्हणून नंतर अक्षरश: दगडाने ठेचून त्या चिमुकलीची हत्या करून टाकली.. त्यानंतर तिचा मृतदेह हा गावातच निर्जनस्थळी फेकून दिला होता. मुलगी बेपत्ता झाल्यामुळे सगळ्यांनी शोध घेतला. तेव्हा एका ठिकाणी ही चिमुरडी जखमी अवस्थेत आढळली होती. चिमुरडीला रुग्णालयात नेलं असता तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे अवघं गाव सुन्न झालं. मृत चिमुरडीच्या वडिलांसोबत आरोपी विजय खैरनार याचे काही महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं. या भांडणाचा बदला घेण्यासाठी विकृत विजयने हे कृत्य केल्याची गावात चर्चा आहे. पोलिसांनी विजयाला अवघ्या काही तासांमध्ये अटक केली.
गावात रास्ता रोको, आंदोलन
या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली.नराधम विजय खैरनारला कडक शिक्षा झाली पाहिजे, यासाठी गावात कडकडीत बंदही पाळण्यात आला. या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी ही उमटले. आरोपीला फाशीची शिक्षा त्वरित द्यावी, या मागणी साठी संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मालेगावला टायर जाळत सुमारे चार तास रास्ता रोको केला. याची माहिती मिळताच मंत्री दादा भुसे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी नातेवाईक आणि ग्रामस्थांची चर्चा केली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे होते.
प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात?
तर मंगळवारी मंत्री दादा भुसे यांच्या सोबत डोंगराळे च्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सदर प्रकरण हा फास्टट्रॅक कोर्टात चालवून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली.
ज्या लेकीबरोबर हे सगळं घडलं. त्या लेकीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आपल्या चिमुरडीने कुणाचं काय वाईट केलं होतं? तिच्यासोबत असं का घडलं? विचारांनी अस्वस्थ झालेले तिचा बाबा अक्षरश: खचले. या प्रकरणी गावात अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे.
