जेवण्यासाठी हाक मारली पण...
वडनेर रेंजरोड परिसरातील ही घटना रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली. आयुष आपल्या घरासमोरच्या मळ्यात खेळत होता. त्याचवेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ओढून नेले. आयुषच्या वडिलांनी त्याला जेवण्यासाठी हाक मारली असता, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी शोध घेतला असता टोमॅटोच्या शेतात रक्ताचे डाग दिसले, तेव्हा ही घटना लक्षात आली.
advertisement
रक्ताने माखलेला मृतदेह सापडला
तात्काळ वनविभाग आणि उपनगर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थ, वनविभागाचे कर्मचारी आणि श्वानपथक यांनी संयुक्तपणे आयुषचा शोध सुरू केला. रात्री ११:४५ च्या सुमारास उसाच्या शेतात त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला.
भावाला बांधली अखेरची राखी
या घटनेमुळे भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुषच्या मागे त्याचे आई-वडील आणि १० वर्षांची मोठी बहीण श्रेया आहे. राखीपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबाचे सांत्वन करणंही कठीण झाले आहे. श्रेयाने आपल्या लाडक्या भावाला अखेरची राखी बांधली. त्यावेळी तिच्या डोळे पाणावल्याचं पहायला मिळालं. ज्या भावासाठी राखी आणून ठेवली होती. तोच भाऊ आपल्याला सोडून गेला, याचं दु:ख या 10 वर्षाच्या चिमुकलीला सहन होत नव्हतं.
नागरिकांमध्ये संताप आणि भीती
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीती आहे. गेल्या सात महिन्यांत पिंपळगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एका चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला होता, पण तो वाचला होता. तसेच, तीन दिवसांपूर्वीच एका महिलेवर पहाटेच्या वेळी बिबट्याने हल्ला केल्याची ताजी घटना घडली होती. वारंवार मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
