नेमकी घटना काय?
६ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना समोर आली होती. सुरुवातीला ही आत्महत्या वाटत असली तरी, हळूहळू यातील गुंतागुंत वाढत चालली आहे. डॉ. मनीषा जेजुरकर हे नाशिकमधील एक प्रतिष्ठित नाव होतं, त्यामुळे त्यांच्या अशा टोकाच्या पाऊलाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
advertisement
धक्कादायक पुरावे आणि संशयाची सुई
न्यायालयात युक्तिवाद करताना फिर्यादींचे वकील ॲड. जयदीप वैशपायन यांनी अत्यंत गंभीर मुद्दे मांडले. ज्या खोलीत डॉ. मनीषा यांचा मृतदेह आढळला, तिथे दोन वापरलेल्या सिरिंज आणि एक चाकू पोलिसांना सापडला आहे. "घटनेच्या वेळी पती घरात उपस्थित असतानाही ही बाब कशी काय घडली?" असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच, मृताच्या कुटुंबीयांनी पोस्टमॉर्टम (PM) अहवालात फेरफार झाल्याचा संशयही व्यक्त केला आहे, ज्यामुळे हे प्रकरण केवळ आत्महत्येचे नसून त्यामागे मोठा घातपात असू शकतो, असा आरोप होत आहे.
मानसिक छळ आणि अनैतिक संबंध
डॉ. मनीषा यांचे भाऊ आणि इतर नातेवाईकांनी त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डॉ. निलेश यांचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून मनीषा यांना प्रचंड मानसिक त्रास दिला जात होता. या सततच्या छळामुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. डॉ. निलेश हे जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असून एका मानसोपचार तज्ज्ञाच्या घरातच पत्नीवर अशा प्रकारची वेळ येणं ही बाब धक्कादायक मानली जात आहे.
तपासाची गती आणि पोलिसांची भूमिका
गंगापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेला दहा दिवस उलटूनही मुख्य संशयित आरोपी डॉ. निलेश जेजुरकर अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाहीत. आरोपी फरार असल्याने तपास संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे आरोपीला जामीन देऊ नये, अशी मागणी वकीलांनी केली आहे. मात्र आता वापरलेलं सिरिंज आणि चाकूचं गूढ वाढत चाललं आहे. यामुळे आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
