ही घटना नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव परिसरातील उंबरखेड इथं घडली. येथील ऊसतोड कामगारावर एकाच वेळी २ बिबट्यांनी हल्ला केला होता. मात्र, त्याची पत्नी धैर्य एकवटून उसाचे दांडके घेऊन बिबट्यांच्या दिशेने धावली. तिने मदतीसाठी किंचाळीही फोडली. त्यामुळे बिबट्यांनी पलायन केलं.
३२ वर्षीय पत्नी आवताबाई यांनी दाखवलेल्या साहसामुळे ऊसतोड कामगार संतोष चव्हाण (३८) यांचा जीव वाचला आहे. आवताबाई यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, समोर दोन बिबटे असतानाही त्यांनी हातात उसाचं दांडकं घेऊन बिबट्यावर प्रतिहल्ला केला. यावेळी घाबरलेल्या दोन्ही बिबट्यांनी पळ काढला.
advertisement
या हल्ल्याबाबात अधिक माहिती देताना आवताबाई चव्हाण यांनी सांगितलं की, गेल्या ३ महिन्यांपासून आम्ही उंबरखेडला शेतात ऊसतोडीचं काम करत होतो. आमचा संसारच इथे होता. गुरुवारी (१८ डिसेंबर) ऊसतोडीच्या शेवटचा दिवस होता. फक्त सहा गुंठ्यांचा ऊस बाकी होता. काम संपेल या आनंदात आम्ही ऊस तोडत होतो. अचानक समोर उसात पानांची जोरात हालचाल झाली. मी आणि माझे पती दोघेही एकमेकांकडे पाहून सावध झालो. काही कळायच्या आतच एका बिबट्याने झेप घेत माझ्या पतीवर हल्ला केला. ते माझ्या पुढे असल्याने त्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटल्यासारखे झाले. तेवढ्यात दुसराही बिबट्या झेप घेऊ लागला. माझ्या अंगात कुठून तरी बळ आले. हातातील उसाचे दांडके जोरात उगारत मी मोठ्याने किंचाळले आणि त्या बिबट्याच्या दिशेनं धावले. माझा आवाज आणि हालचाल पाहून दोन्ही बिबटे थबकले आणि क्षणातच पळून गेले.
