मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीच्या कामावरून दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, मात्र काही वेळातच हा वाद हाताबाहेर गेला. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर विटा, दगड, लाकडी काठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या जोरदार दगडफेकीत अनेक जण रक्तबंबाळ झाले असून १७ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या हाणामारीचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडताना आणि दगडफेक करताना स्पष्टपणे दिसत आहेत. या व्हिडिओमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
पोलिसांची धाव आणि गुन्हे दाखल
घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या हिंसक प्रकारानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटांतील संशयितांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू केला आहे.
