नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याने या परिसरातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी मागणी वाढली. ही वाढती मागणी लक्षात घेऊन, नवी मुंबईसाठी सिडकोने नागरिकांना नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. सिडकोने विमानतळाच्या अगदी जवळ वेगवेगळ्या भागांत भाडेपट्ट्यावरील 30 महत्त्वाचे भूखंड लिलावासाठी काढले आहेत.
कुठे होणार लिलाव?
या भूखंडाचा लिलाव आज 16 ऑक्टोबर रोजी होणार असून 17 ऑक्टोबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सामान्य नागरिक सिडकोच्या भूखंडांसाठी eauction.cidcoindia.com या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन केले असून, डिसेंबर 2025 पर्यंत येथील व्यावसायिक कामकाज सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, विमानतळ सुरू होण्यापूर्वीच या भागातील मालमत्ता खरेदी करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे.
advertisement
मोठा दिलासा! या जिल्ह्यातील ४.२७ लाख शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
30 भूखंड निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी
सिडकोने 24 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, हे 30 भूखंड नवी मुंबईच्या अनेक नोड्समध्ये आहेत. या लिलावात खास करून आठ बंगल्यांच्या भूखंडाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आठ भूखंड केवळ निवासी इमारतींच्या बांधकामासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित भूखंडांमध्ये चार भूखंड निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी, चार केवळ व्यावसायिक वापरासाठी, तर काही भूखंड स्टोरेज आणि गोदाम यांसारख्या सेवा उद्योगासाठी वाटप केलं जाणार आहे.
भूखंडांचे स्थान आणि किमती
लिलावासाठी उपलब्ध असलेले हे 30 भूखंड खारघर, ऐरोली, नेरुळ, द्रोणागिरी, नवीन पनवेल, कोपर खैरणे, सानपाडा आणि कळंबोली यांसारख्या वेगवेगळ्या नोड्समध्ये पसरलेले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व भूखंड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून केवळ 30 ते 45 मिनिटांच्या अंतरावर आहेत, ज्यामुळे त्यांचे महत्त्व वाढले आहे.
सिडकोने यावेळी सर्वात महागडा भूखंडही लिलावासाठी ठेवला आहे. निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी असलेला 41,994 चौरस मीटरचा हा भूखंड असून, त्याची मूळ राखीव किंमत प्रति चौरस मीटर 3.51 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या भूखंडाची एकूण आधारभूत किंमत 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त, 400 ते 500 चौरस मीटर क्षेत्रफळाचे आठ बंगल्यांचे भूखंड प्रति चौरस मीटर 1.25 लाख या राखीव दराने लिलावात विक्रीसाठी ठेवले आहेत.