एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगच्या दहाव्या मजल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग भडकली. इमारतीमधील एका घराला आग लागल्याचे समजताच रहिवाशांनी तातडीने इमारत रिकामी केली आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या गाड्यांसह पनवेल महापालिका व एमआयडीसी अग्निशमन दल देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
तीन मजल्यावर पोहचली आग...
रात्री उशिरा लागलेली आग 10व्या, 11व्या आणि 12व्या मजल्यावर ही आग भडकली. आग इतकी मोठी होती. वरच्या मजल्यांवरील रहिवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12व्या मजल्यावरील घरात पूजा राजन (वय 40), तिचे पती सुंदर बाळकृष्ण आणि त्यांची 6 वर्षीय मुलगी वेदिका यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.
दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या 85 वर्षीय वृद्ध महिला या व्हिलचेअरवर होत्या. व्हीअलचेअरवर असल्याने त्या खोलीतून बाहेर पडू शकल्या नाहीत. त्यांचादेखील होरपळून मृत्यू झाला.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या आगीत एकूण 10 जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
घटनास्थळी पोलीस, अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन पथके तैनात असून आगीचं नेमकं कारण शोधण्याचे काम सुरू आहे. रहिवाशांमध्ये भीतीचं आणि दुःखाचं वातावरण पसरलं आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.