अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. एकीकडे अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन सुरू असताना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली होती. मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका सुरू असताना बारामतीतून नरेश अरोरा यांचं नाव समोर आलं. नरेश अरोरा हे राष्ट्रवादी पक्षाचे राजकीय सल्लागार असल्याचं आता समोर आलं आहे.
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी व्हावा यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नरेश अरोरा शपथविधीच्या मुख्य कार्यक्रमालाच गैरहजर होते. शपथविधीच्या निमित्ताने सुचवण्यात आलेल्या बाबींकडे दुर्लक्ष केल्यानं राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज दुपारी देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला अरोरा यांनी हजेरी लावली होती. पण, शपथविधी सोहळ्यालाा अरोरा गैरहजर होते. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घ्यावी या प्रक्रियेत अरोरा यांचा महत्त्वाचा रोल होता. पण, आता अरोरा गैरहजर असल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडणूक लांबणीवर
तर दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांची आज केवळ विधिमंडळ गटनेता निवड आणि उपमुख्यमंत्री शपथविधी पार पडला आहे. पण राष्ट्रवादी पक्षाकडे कार्यकारी अध्यक्षपद हे एक महत्वाचे पद आहे. आता राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची घाई केली जाणार नाही. सध्या जिल्हा परिषद निवडणूक, अर्थ संकल्पीय अधिवेशन अश्या बऱ्याच महत्वाच्या घटना असल्यामुळे ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे.
कोण आहे नरेश अरोरा?
नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स ही कंपनी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीसाठी काम करत आहे. अजित पवारांच्या सभांचे नियोजन करणे, अजित पवारांची प्रतिमा जनमानसात कशी जावी यासाठी धोरण ही कंपनी आखण्याचे काम केलं होतं. अजित पवारांच्या निवडणूक प्रक्रियेत या कंपनीचा मोठा वाटा आहे. पुणे पालिका निवडणुकीच्या काळात अरोरा यांच्या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रान्चने धडक दिली होती. त्यानंतर अजित पवारांनी या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही, असं स्पष्ट केलं होतं. तसंच नरेश अरोरा आणि त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठामपणे उभी होती.
