अजित पवार यांच्यावर प्रेम करणारी जनता, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली देणारे मोठ मोठे फ्लेक्स बारामतीत लावले आहेत. अजित पवार यांचे राजबिंडे रूप असलेले फोटो लावून, त्यांची कार्यशैली त्यावर नमूद करून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. मात्र अजित पवार यांच्या नावासमोरील दिवंगत, स्वर्गीय अशी विशेषणे रोहित पवार यांना सैरभैर करून गेली आहेत.
advertisement
रोहित पवार भावनिक का झाले?
डोंगराएवढ्या दुःखापुढे आज पहिल्यांदाच ना पदाचे कौतुक आहे... ना आनंदाचा जल्लोष…! गळ्यात हार घातलेला मा. अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाहीय. आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि मा. अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, मा. अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार..! त्यामुळे मा. अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचे जसे धाडस माझ्यात नाही तसे आपणही करू नये, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या जागा कोण घेणार, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अत्यंत वेगाने घडामोडी घडत आहेत. पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी होईल. तत्पूर्वी विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
