आपली दहशत राहावी म्हणून पुण्याच्या कोथरूडमध्ये गोळीबार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटा पासपोर्ट मिळवून पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून लंडनवारीला निघून गेलेल्या नीलेश घायवळच्या संपत्तीबाबत नवी माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला घायवळच्या संपत्तीबाबत माहिती मागितली होती.
घायवळने तब्बल ६० एकर जमीन खरेदी केली, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची माहिती
advertisement
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार निलेश घायवळ याने जामखेड आणि परिसरात तब्बल ६० एकर जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. गुन्हेगारी क्षेत्रातून जमा केलेल्या पैशातून मूळगावी जामखेडकडे संपत्ती खरेदी केल्याचे समोर आले आहे. निलेश हा मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा आहे. सोनेगावमध्ये घायवळ कुटुंबाची वडिलोपार्जत जमीन आहे. परंतु याशिवाय नीलेशने गेल्या काही वर्षात जमीन खरेदी विक्रीचे १४ व्यवहार केल्याचे समोर आले आहे.
खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे नीलेश घायवळ याच्या नावावर दाखल आहेत. गुन्हेगारी क्षेत्रातून नीलेश घायवळ याने अमाप माया जमा केली आहे. पुण्याच्या काही भागांत घायवळ याने सदनिका खरेदी केल्या आहेत.
नीलेश घायवळची जिव्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू होती
पुण्याच्या कोथरूड भागात दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार करूनचौकशीचा ससेमिरा लागताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नीलेश घायवळ लंडनला पळून गेला आहे. नीलेशची आई कुसूम घायवळ यांनी मात्र आपल्या मुलावरील सगळे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहायचे होते मात्र घायवळ बंधूंनी राजकारणात उतरू नये यासाठी त्याचे विरोधक त्याच्यावर नाहक आरोप करून बदनामी करत असल्याचे कुसूम घायवळ म्हणाल्या.
निलेशने स्वत:हून काही केले नाही, त्याच्याकडून करवून घेतले गेले. न्यायालयाने त्याला अनेक गुन्ह्यांत निर्दोषही सोडले. त्यानंतर आपण चांगले आयुष्य जगायचे, गुन्हेगारीच्या घाणीत आता जायचे नाही, असे त्याने मला सांगितले. मागच्या चार वर्षांपासून आम्ही सगळेच चांगले जीवन जगत होतो. परंतु राजकारणी लोक खूप वाईट आहेत. त्यांना घायवळ भावांना वरती येऊ द्यायचे नाही. त्यांनी राजकारणात येऊ नये, गुन्हेगारीत राहावे आणि जेलमध्येच जावे, अशी राजकारण्यांची इच्छा आहे. नीलेशला राजकारणाचा छंद आहे. त्याला येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत लढायचे होते. परंतु त्याने राजकारणात येऊ नये म्हणून त्याच्यावर आरोप लावण्यात आले, असे नीलेशची आई कुसूम घायवळ यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना सांगितले.
