कोल्हापूर : राज्यात हिंदी भाषेवरून वादंग उठल्याचे या आठवड्यात पाहायला मिळाले. राज्य सरकारने हिंदी सक्ती मागे घेतली. याचा राज आणि उद्धव ठाकरे यांनी जल्लोष ही साजरा केला. हिंदी भाषेच्या सक्तीला या दोघांचा आक्रमक असा विरोध होता, मात्र शालेय अभ्यासक्रमात या भाषांचा सक्ती न करता समाविष्ट झाल्यावर ते विद्यार्थी आवडीने शिकतात हे सुद्धा वास्तव कोल्हापूरच्या एका शाळेतून आता समोर आले आहे. कोल्हापूरातल्या पट्टणकडोली ता.हातकणंगलेच्या एका शाळेत जर्मन, रशियन, जपानी अशा सात भाषा शिकवल्या जात आहेत. या भाषा शिकताना ना पालकांची तक्रार आहे ना विद्यार्थ्यांची अडचण.
advertisement
अनंत विद्यामंदिर शाळेचे हे विद्यार्थी मराठी भाषेतून नव्हे तर चक्क रशियन आणि जर्मन भाषेत प्रार्थना म्हणतात. या शाळेत एक दोन नव्हे तर तब्बल सात भाषा आणि एक लिपी शिकवली जाते. इथले विद्यार्थी अ आ इ ई आणि बाराखडीचे धडे वेगवेगळ्या भाषेत शिकत आहेत. मराठी हिंदी इंग्रजी या रोजच्या सरावाच्या भाषा आहेतच, मात्र त्यासोबत कन्नड आणि विदेशी भाषा म्हणून रशियन, जर्मन, जापनिज भाषेचे धडे गिरवतात. सध्या भाषेवरून वाद सुरू असताना आणि भाषेचे दडपण विद्यार्थ्यावर येईल, अशी भीती घातली जात असताना इथले विद्यार्थी मात्र या भाषेमध्ये चांगलेच रमले आहेत. भविष्यात परदेशात शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी जाताना याचा फायदा होणार असल्याचे ते सांगतात.
केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम नाही तर आपल्या शाळेतील मुले जागतिक पातळीवर टिकली पाहिजेत या हेतूने संस्थापक शिरीष देसाई यांनी आपल्या शिक्षकांना शिवाजी विद्यापीठातून विदेशी भाषा शिकायला लावून त्या विद्यार्थ्याना शिकवायला सुरवात केली आहे. शिक्षकांना या भाषा शिकवताना अडचण निर्माण झाली मात्र विद्यार्थ्याना याची गोडी लागल्याने त्यांची ही अडचण दूर झाली. सध्या या शाळेत 1300 विद्यार्थी शिक्षक घेत आहेत, त्यापैकी 300 विद्यार्थी मोडी लिपीसह तीन विदेशी भाषा शिकत आहेत. या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेतली जात असून पालकांचाही ओढा मुलाना बहुभाषिक बनवण्याकडे असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले.
