कोल्हापूर : एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झाल्यास किंवा शाळेची फी परवड नसल्यास किंवा शिकवण्याची पद्धत न आवडल्यास पालक आपल्या मुलांचा प्रवेश एका शाळेतून दुसऱ्या शाळेत करतात. या प्रक्रियेसाठी मुलांच्या जुन्या शाळेकडून ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला मिळणं आवश्यक असतं. परंतु अशा परिस्थितीत बऱ्याचदा जुन्या शाळेकडून आपली पटसंख्या कमी होईल या भीतीनं ट्रान्सफर सर्टिफिकेट देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. यामुळे पालक आणि त्यांच्या पाल्याला नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र आता याबाबत अजिबात चिंता करण्याची गरज नाही.
advertisement
शाळेनं ट्रान्सफर सर्टिफिकेट अडकवल्यावर कोणाकडे दाद मागायची हे पालकांना सूचत नाही. यावरून अनेकदा पालक आणि शाळा प्रशासनामध्ये वाद झाल्याचे प्रकार समोर येतात. परंतु अशा पद्धतीनं कोणतीही शाळा कोणत्याही विद्यार्थ्याचं ट्रान्सफर सर्टिफिकेट अडकवून ठेवू शकत नाही. म्हणूनच शिक्षण विभागानं अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा : या सरकारी शाळेला तोड नाही! 13 पुरस्कार, 25 आदर्श शिक्षक, 200 विद्यार्थी प्रतीक्षेत
कोणत्याही शाळेकडून ट्रान्सफर सर्टिफिकेट देण्यास विनाकारण टाळाटाळ केली जात असेल तर पालकांनी न घाबरता संबंधित शाळेविरोधात बिनधास्त तक्रार नोंदवण्याचं आवाहन शिक्षण विभागानं सर्व पालकांना केलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे पालकांनी अतिशय काळजीपूर्वक आपल्या मुलांचा प्रवेश दुसऱ्या शाळेत करावा. सर्वात आधी नव्या शाळेत प्रवेश निश्चित व्हायला हवा. मग जुन्या शाळेकडे ट्रान्सफर सर्टिफिकेटसाठी लेखी अर्ज करावा. त्यानंतर जर जुन्या शाळेकडून हे सर्टिफिकेट देण्यास टाळाटाळ होत असल्याचं निदर्शनास आलं तर पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवणं अपेक्षित आहे.