वंजारी आणि बंजारा अजिबात एक नाही. धनंजय मुंडे यांनी संभ्रम निर्माण करू नये, असे स्पष्टपणे सुनावत बंजारा समाजाच्या व्यासपीठावरून केलेले वक्तव्य कशासाठी होते याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.
आधीच अडीच टक्के आरक्षण गेल्याची भावना आमच्यामध्ये आहे
या अगोदरच बंजारा समाजाच्या आरक्षणामध्ये अडीच टक्के आरक्षण गेल्याची भावना समाजामध्ये आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना बंजारा समाजाने नेता मानले होते. आता अनुसूचित जमातीमधील (एसटी) आरक्षणाची मागणी ही स्वतंत्र आहे. त्या संदर्भात व्यासपीठावर केलेले वक्तव्य कशासाठी होते याचे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी द्यावे, असे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड म्हणाले.
advertisement
धनंजय मुंडे त्यावेळी लहान असतील, त्यांना आरक्षण प्रश्न किती समजतो?
वंजारा आणि बंजारा हे वेगळे आहेत, त्यासाठी समिती नेमली होती. वाधवा समितीने बंजारा आणि वंजारी हे वेगळे असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. १९९१-१९९२ सालची ही घटना आहे. त्यावेळी धनंजय मुंडे हे लहान असतील. तो लढा मी आणि मकरंद पवार यांनी मिळून लढला. वंजारा-बंजारा वादामुळेच मला नेतृत्व करायला मिळाले, असे सांगायला देखील हरकत नाही. मुळात धनंजय मुंडे यांना आरक्षण प्रश्न किती समजतो, अशी विचारणाही हरिभाऊ राठोड यांनी केली.
बंजारा समाजाचे खानपान, भाषा, देवदेवता ही देशात एक सारखीच
कर्नाटक आणि राजस्थानात वंजारी समाजाची नोंद ही अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आहे. दोन्ही राज्यात तशा नोंदी आहेत, असे धनंजय मुंडे आजच्या भाषणात म्हणाले. त्यांचे मुद्देही हरिभाऊ राठोड यांनी खोडून काढले. कुठल्याही नोंदी कुठेही जोडता येत नाहीत. धनंजय मुंडेंकडून चुकीची माहिती जाऊ नये. वंजारी आणि बंजारा उच्चारातील साधर्म्यामुळे इंग्रजांवेळी गॅझेटमध्ये चूक झाली असेल ती गोष्ट वेगळी. आमचे खानपान, भाषा, देवदेवता ही देशात सारखीच आहे. धनंजय मुंडे यांनी चुकीच्या गोष्टी सांगून संभ्रम निर्माण करू नये, असे हरिभाऊ राठोड म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर बंजारा बांधव आक्रमक
वंजारी-बंजारा एकच आहेत, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक झाला आहे. वंजारी बंजारा एक नाही, या अगोदरच तुम्ही आमच्या ताटातले अडीच टक्के आरक्षण घेतले आहे. वंजारा -बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या, अशी मागणी करत बंजारा समाजाने घोषणाबाजी केली.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
आज बीड शहरेरमाइं आपळे समस्त बंजारा समाजेर एकजूट देखन मारो मन भरान आवगो! हानुच एकजूट आंग रकाडन आरक्षणं लढा तीव्र करा...! आज बीड शहरात बंजारा समाजाच्या वतीने आयोजित भव्य विराट मोर्चास उपस्थित राहून उपस्थित बंधवांशी संवाद साधला. या मोर्चाच्या माध्यमातून मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट मधील नोंदीनुसार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण देण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.