काँग्रेसचे नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या हितासाठी मुंबईत बैठक बोलावली आहे. पण या बैठकीसाठी अनेक महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांना निमंत्रण मिळालेलेच नाही, अशी त्यांची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी या बैठकीतून एकसंघ भूमिका तयार होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना म्हटले की, आम्ही येत्या एक दोन दिवसात कोर्टात जाणार आहोत. हा जीआर सगळ्या नियमांचे आयोगाचे, कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे. इतकेच काय हा संविधानाचे उल्लंघन करणारा हा जीआर आहे. त्यामुळे तो कोर्टात टिकणार नाही यांचा आम्हाला ठाम विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
प्रकाश शेंडगे यांनी म्हटले की, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून मला या क्षणापर्यंत निमंत्रण मिळाले नाही. आम्ही छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आधीच भूमिका घेतली असून आता काम सुरू केले आहे. तुम्ही पक्ष बाजूला ठेऊन एकत्र या, असे आवाहन त्यांनी वडेट्टीवार यांना केले. माझे डॉ. बबनराव तायवाडे यांना देखील आवाहन करत असून त्यांनी एकत्रित यावे असे शेंडगे यांनी म्हटले.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध असून, मराठ्यांचा ओबीसीत समावेश होत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. परिणामी ओबीसी नेते आता दोन स्तरांवर – न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरचे आंदोलन – अशा दुहेरी मार्गाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार आहेत. मात्र, जीआरवरून आणि आंदोलनाच्या पातळीवर ओबीसी संघटनांमध्ये एकमत नसल्याचे दिसून येत आहे.