एखाद्या श्वानाला माणसाने जर जीव लावला तर जिवाच्या पलीकडे ही तो श्वान आपल्या मालकाला जीव लावतो, अशीच काहीशी घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडवळ गावातील घडली आहे. शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांची दोन एकर शेती पत्नी मुलासह त्या गावात राहत होते. 7 ऑक्टोबर म्हणजेच दहा दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने तानाजी पवार यांचे निधन झाले. तानाजी पवार यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत तानाजी पवार यांच्या पार्थिवावर शोक व्यक्त करण्यासाठी परिवारासह नातेवाईक, गावातील लोक वडवळ येथील स्मशानभूमीत गेले.
advertisement
तेव्हा सर्वांनी पाहिलं की ज्या कुत्र्याला तानाजी पवार जीवाला जीव लावत होते, तो श्वान गेल्या 9 दिवसांपासून त्याच स्मशानभूमीत हताशपणे बसून राहिला होता. हे चित्र पाहून पवार यांच्या परिवारातील लोकांचे अश्रू अनावर झाले. पवार यांच्या नातेवाईकांनी त्या श्वानाला परत आपल्या घरी घेऊन गेले परंतु तो श्वान घरी न थांबता त्याच स्मशानभूमीत बसून राहत आहे. श्वान त्यांच्या मालकाप्रती असलेल्या निष्ठेसाठी ओळखले जातात हे त्याचे मानवी कुटुंबासोबत बनलेले बंधन असते. मालकासाठी असलेली निष्ठा प्रेम पाहून या श्वानाची वडवळ येथील नागरिकांच्या तोंडून कौतुकाचे शब्द निघत आहे.