मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेख खलील शेख नुरा हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्याकडे शाळेत संगणक खरेदी करण्यासाठी आणि बांधकामासाठी लागणारी रक्कम देण्यात आली होती. जेडीसीसी बँकेतून काढलेले दोन लाख रुपये त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर ते आपल्या घराकडे निघाले.
लहान मुलाने केला फिट येण्याचा बनाव
शेख खलील आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये दुचाकी लावत असताना, अचानक एका लहान मुलाने रस्त्यावर खाली पडून फिट आल्याचा बनाव केला. शेख खलील यांचे लक्ष विचलित करण्यासाठी ही युक्ती वापरण्यात आली. मुलगा खाली पडलेला पाहून शेख खलील मदतीसाठी त्याच्या दिशेने धावले. दरम्यान, दुचाकीची चावी तशीच लागलेली राहिली.
advertisement
चोरट्यांनी साधली संधी
शेख खलील मुलाकडे धावल्यानंतर, दोन चोरटे दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी त्या मुलासाठी पाणी आणण्यास सांगितले. शेख खलील घरात पाणी आणण्यासाठी जाताच, चोरट्यांनी ही संधी साधली. त्यांनी तात्काळ दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये काढले आणि त्या लहान मुलासह तिघांनीही घटनास्थळावरून पोबारा केला. हा सगळा प्रकार अवघ्या ६० सेकंदाच्या आत घडला. याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलासह तिघा चोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे.