माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी भागात मुंडे कुटुंबाचे राजकीय वजन आहे. मात्र पक्षातून डावलले जात असल्याने राजाभाऊ मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय निवडलाय. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्याने पंकजा मुंडे यांना धक्का मानला जातोय.
विधानसभेची निवडणूक लढविल्याने पंकजा मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्यात मतभेद
advertisement
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून मुंडे कुटुंबीयांशी एकनिष्ठ असलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असून लवकरच तारीख देखील जाहीर केली जाणार आहे. दरम्यान बाबरी मुंडे यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. याच कारणावरून पंकजा मुंडे व बाबरी मुंडे यांच्यात मतभेद झाले होते.
त्यानंतरपासून बाबरी मुंडे हे कोणत्याही पक्षाशी संलग्न नव्हते. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले असून माजलगाव मतदारसंघातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असून लवकर द्यायची तारीख जाहीर केली जाणार आहे.
