परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारावेळी शिंदे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे थेट हिंसेत रुपांतर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ही घटना 21 नोव्हेंबर रोजी घडली असून सध्या त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रचारावरून दोन पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली आणि काही क्षणात या वादाने हिंसक रुप घेतले. कार्यकर्त्यांनी चाकूने वार केले तसेच दगडफेक देखील झाल्याचे समोर आले आहे.
advertisement
घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात
या घटनेत अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून काहींच्या डोक्यावर खोल जखमा झाल्याने त्यांना टाके पडले आहेत. जखमींना तात्काळ परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत गस्त घालण्यात येत आहे.दरम्यान, या प्रकरणावरून शिंदे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.
शांतता राखण्याचे आवाहन
पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि अन्य पुरावे जमा करण्यात येत आहेत. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
