परळी येथील वैद्यनाथ अर्बन बँकेच्या १७ जागांपैकी १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. बँकेच्या १७ संचालक मंडळाच्या जागांसाठी रविवारी १०८ केंद्रावर मतदान पार पडले. बँकेच्या ४ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. महिला मतदार संघातून डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे, माधुरी योगेश मेनकुदळे, ओबीसी मतदार संघातून अनिल तांदळे तर अनुसूचित जाती मतदार संघातून विनोद जगतकर हे बिनविरोध निवडणूक आले.
advertisement
मुंडे बहीण भावाने वर्चस्व कायम राखले
बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शरद पवार गटाने उमेदवार दिले होते. शरद पवार गटाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात प्रामुख्याने राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झाला आहे. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मुंडे बहीण भाऊ एकत्र होते. पंकजा मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसून आले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजाभाऊ फड यांचे डिपॉजिट जप्त
विजयी उमेदवार रमेश कराड म्हणाले, "धनुभाऊ आणि पंकजा मुंडे यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय मिळाला आहे. ९५ टक्क्यांच्या पुढे मुंडे बहीण भावाच्या पॅनेलला मतदान मिळाले आहे.या निवडणुकीत अजिबातच रस्सीखेच नव्हती. शरद पवार गटाला तर उमेदवारही मिळाले नाहीत. त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर वैद्यनाथची पहिलीच निवडणूक पार पडली. दोघांच्या एकत्रित येण्याने आम्हाला ही निवडणूक अतिशय सोपी गेली. विरोधी गटामुळे निवडणूक लादली गेली, ज्यामुळे बँकेचाही निवडणूक खर्च झाला. नाहीतर निवडणूक बिनविरोध झाली असती."
गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ अर्बन बँक स्थापन केली होती
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ अर्बन बँक स्थापन केली होती. परळीच्या तत्कालिन नेत्यांना सोबत घेऊन राजकारणाला समाजकारणाची जोड देण्यासाठी त्यांनी वैद्यनाथ अर्बन बँक सुरू केली. मुंडे यांच्या हयातीत बँकेची सूत्रे त्यांच्याकडेच राहिली. त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांच्याकडे बँकेची सूत्रे गेली. परळी अर्बन बँकेच्या शाखा बीड, धाराशिव, सोलापूर, नवी मुंबई, पुणे आदी जिल्ह्यांत आहे.
