देवयानी फरांदे (आमदार, भाजप) , प्रभावाला उतरती कळा
महापालिका निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती होऊनही देवयानी फरांदे यांना पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसला. पक्षप्रवेशांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्यावर उघडपणे व्यक्त झालेली नाराजी अखेर निकालात दिसून आली. मध्य मतदारसंघात भाजपच्या हक्काच्या चार जागांवर पराभव पत्करावा लागल्याने पक्षाचा टक्का घसरला. याशिवाय पारंपरिक प्रतिस्पर्धी शाहू खैरे, वसंत गिते आणि विनायक पांडे यांच्या विजयामुळे विरोधकांची ताकद अधिक वाढली. पक्षाच्या धोरणामुळे स्वतःच्या मुलाची उमेदवारी मागे घ्यावी लागणे आणि ज्येष्ठ आमदार म्हणून शहरव्यापी नेतृत्व सिद्ध करण्यात आलेले अपयश यामुळे फरांदे यांचा प्रभाव मर्यादित गटापुरताच राहिला.
advertisement
नाराजी भोवली
वरिष्ठांविरोधात व्यक्त झालेली नाराजीही त्यांना भोवली. आता मतदारसंघातच आव्हाने वाढली असून शिंदेसेनेचे अजय बोरस्ते, भाजपचेच शाहू खैरे व विनायक पांडे, उद्धवसेनेचे वसंत गिते आणि राष्ट्रवादीच्या हेमलता पाटील यांच्या विजयामुळे आगामी काळ अधिक कठीण ठरण्याची शक्यता आहे.
सीमा हिरे (आमदार, भाजप), गटबाजीचा फटका
सिडको आणि सातपूर भागात निकटवर्तीयांना उमेदवारी मिळवून देण्यात सीमा हिरे यांना यश आले, मात्र निकालाच्या दृष्टीने पदरी निराशाच आली. सिडकोत उमेदवारी वाटप करताना निष्ठावंतांच्या नावाने दिलेले अनेक उमेदवार अपयशी ठरले.
तिकीट वाटपात झालेला एबी फॉर्मचा गोंधळ राज्यभर चर्चेचा विषय ठरला आणि त्या गोंधळाचा थेट फटका भाजपला बसला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत सिडकोतून सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या भाजपला याच भागात महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता असून, आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत आव्हानांचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. सिडको व सातपूरमध्ये गट-तट दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
सरोज आहिरे (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) प्रतिष्ठेची लढत, पण यश दूर
सर्वाधिक चर्चेत असलेल्या भगूर नगरपरिषदेचा प्रभाव महापालिका निवडणुकीत राखण्याचे आव्हान सरोज आहिरे यांच्यासमोर होते. देवळाली विधानसभा मतदारसंघातील प्रभाग १९ आणि २२ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांमुळे चुरस निर्माण झाली होती.
पहिल्यांदाच या दोन मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या चिन्हावर पॅनल उभे करून संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यातील निवडणुकांसाठी पाया मजबूत करण्यात यश आले, मात्र पॅनल विजयी करण्यात अपयश आले. घरोघरी जाऊन प्रचार करूनही उमेदवारांना पक्ष नेतृत्वाकडून अपेक्षित रसद आणि पाठबळ न मिळाल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. देवळाली विधानसभा मतदारसंघातील या दोन प्रभागांतील आठही जागांवर अपयश आल्याने निराशा वाढली आहे.
