शहापूर: मुंबईजवळील शहापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणपती विसर्जनानंतर डीजे वाजवण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून ते उपचार घेत होते, पण पोटात दुखायला लागल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले अन् उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पिवळी विभागातील खोर इथं गणेश विसर्जनकरून आल्यानंतर रात्री मांडवात रवींद्र गणपत आरे यांनी मुलांना डिजे लावायला सांगितला. त्यामुळे तेथील रहिवाशी महालु दुभेला त्यांचा मुलगा सुनील दुभेला आणि त्यांची पत्नी मनिषा सुनील यांनी रवींद्र यांना मारहाण केली होती. त्यावेळी गावकऱ्यांनी मध्यस्ती करत रवींद्र यांना पिवळी इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं पण तेथून सिटीस्कॅन आणि एक्स-रे काढून आणण्यासाठी त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. तिथे ही सुविधा नसल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात जावं लागलं होतं.
advertisement
या सर्व गडबडीत ६ दिवस निघून गेले त्यानंतर आज पुन्हा त्यांना सरकारी दवाखान्यात पोट दुखते म्हणून आणलं असता पोटात पाणी झालं असून ते काढावं लागेल, असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. मात्र उपचारादरम्यान रवींद्र यांचा आज शनिवारी मृत्यू झाला. रवींद्र यांच्या मृत्यूला शेजारीच कारणीभूत आहे. सात दिवसांपूर्वी मारहाण करणारे महालु, सुनील आणि मनिषा दुभेला असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक करावी, जोपर्यंत पोलीस कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, घटनेची नोंद करण्याची कारवाई सुरू असून पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येईल. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाशिंद पोलीस स्थानकाचे पोलील निरीक्षक हिंदुलकर यांनी सांगितलं.