दरम्यान, संबंधित महिला डॉक्टरवर भाजप नेते आणि माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा दबाव होता, असा आरोप केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तर काही पुरावे सादर करत निंबाळकरांनी महिलेवर कशाप्रकारे दबाव टाकला, याचा खुलासा केला आहे. पण हे सर्व आरोप निंबाळकर यांनी फेटाळून लावले आहेत. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी भुवया उंचवणारं विधान केलं आहे.
advertisement
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजीतसिंह नाईकनिंबाळर आणि त्यांच्या स्वीय सहाय्याकाचं नाव समोर येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण संपूर्ण परिस्थिती समोर येत नाही, तोपर्यंत यावर बोलणं योग्य नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. भरत गोगावले यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणात खरंच निंबाळकरांचं काही कनेक्शन आहे का? याबाबत संशय निर्माण झाला आहे. गोगावले नुकतंच आळंदी इथं आले होते. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
भरत गोगावले नक्की काय म्हणाले?
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबद्दल विचारलं असता भरत गोगावले म्हणाले, "फलटण इथं डॉक्टर तरुणीवर झालेला बलात्कार आणि आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांचं नाव येत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत संपूर्ण वस्तुस्थिती समोर येत नाही, तोपर्यंत यावर बोलणं योग्य नाही. ज्या पद्धतीने डॉक्टर तरुणीवर अत्याचार झाला, तो अत्यंत दुर्दैवी असल्याचंही गोगावले यांनी म्हटलं.
