पक्षातील निष्ठावंतांना बाजूला सारून आयारामांना उमेदवारी देण्याचे काम अनेक निवडणुकांत होते. यंदाही महापालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर तुल्यबळ आव्हान निर्माण करण्याकरिता थेट उपमहापौर राहिलेले राजू मिसाळ यांना फोडण्याची भाजपची रणनीती आहे. तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक अमित गावडे यांनाही प्रवेश देण्याचे भाजपचे नियोजन आहे.
कोणत्या संभाव्य पक्षप्रवेशावरून नाराजीनाट्य?
त्यामुळेच पिंपरी चिंचवड मध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी आत्मक्लेष आंदोलन केले. राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, त्याचबरोबर शिवसेनेचे माजी नगरसेवक अमित गावडे यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकासमोर भाजपचे इच्छुक उमेदवार आंदोलनाला बसले आहेत.
advertisement
भाजपने आयारामांना प्रवेश दिला तर बंडखोरी करून निवडणूक लढवणार
आपल्या विरोधानंतरही जर भाजपने आयारामांना प्रवेश दिला तर बंडखोरी करून निवडणूक लढवणार असल्याचा इशाराही या इच्छुक नेत्यांनी दिल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. आंदोलन करणारे हे सगळे इच्छुक पिंपरी शहरातील RSS चा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १५ मधील संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे इतर पक्षातील नेत्यांना संधी देऊन बेरजेचे गणित करायचे की आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना उमेदवारी द्यायची, असा यक्षप्रश्न भाजपसमोर आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेटपणे जाहीर केले आहे. आम्ही जर एकत्रित लढलो तर प्रतिस्पर्धी पक्षाला त्याचा फायदा होईल, त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढाई होईल.
