वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्या पण तिकीट मिळत नसलेल्यांनी इतर पक्षांची वाट धरलीय. महायुती आणि महाविकास आघाडीत अशा नाराज नेत्यांची संख्या निवडणूक जाहीर होताच वाढलीय. शिवसेनेत फुटीनंतर पक्षात प्रवेश केलेल्या पोहरादेवीच्या महंतांनी आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम केलाय. त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली असून उद्धव ठाकरे यांनी गेल्या दहा महिन्यात एक मिनिटाचासुद्धा वेळ दिला नाही असं त्यांनी म्हटलं.
advertisement
पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी म्हटलं की, उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मागील आठ-दहा महिन्यांपासून भेटत नाहीत. भेटीसाठी अनेकदा वेळ मागितली मात्र त्यांना 1 मिनिटांचा वेळ ही देण्यात आला नाही. बंजारा समाजाच्या समस्या मांडण्यासाठी मला उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती.
उबाठाच्या कठीण काळात पक्षाला मदत व्हावी यासाठी मी उबाठा पक्षात प्रवेश केला होता. मला कारंजा किंवा दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवायची होती. पण माझ्या मागणीकडे उबाठाने दुर्लक्ष केलं. उद्धव ठाकरेंना संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज यांच्या वंशाजांची गरज नाही असं म्हणत पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी पदाचा राजीनामा दिलाय.
मविआने अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. काँग्रेस १०५ ते ११० जागा लढण्याची शक्यता आहे. तर शिवसेना उबाठा गटाला ९० ते ९५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ७५ ते ८० जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
