महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यापासून अजित पवार पुणे जिल्ह्यात ठाण मांडून बसले होते. त्यांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी सगळी ताकद पणाला लावली होती. यासाठी त्यांनी शरद पवार गटासोबत देखील युती केली होती. पण या दोन्ही महानगर पालिकेत अजित पवारांना धक्का बसला आहे. महापालिकेचा हा निकाल अजित पवारांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलं आहे.
advertisement
निकालाच्या दिवशी अजित पवार प्रसारमाध्यमांपासून दूर राहिले. काही पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण ते कुणालाही उत्तर न देता निघून गेले. त्यांचा चेहरा पडला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचं स्पष्टपणे दिसून येत होता. महापालिकेच्या निकालानंतर अजित पवारांनी राजकीय हालचालींना वेग दिला आहे.
अजित पवार हे बारामतीच्या दिशेनं रवाना झाले आहे. इथं ते गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत. अजित पवारांसोबत शरद पवार गटाचे माजी आमदार राजेश टोपे देखील आहेत. महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार तडाफडकी शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात अजित पवार मोठा निर्णय घेऊ शकतात, असंही बोललं जात आहे.
दुसरीकडे, महापालिकेतील पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे. यासाठीच ते शरद पवारांशी चर्चा करण्यासाठी गेल्याचं देखील सांगितलं जात आहे. सध्या पवार काका पुतण्यांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र महापालिकेतील पराभवानंतर अजित पवार अशाप्रकारे शरद पवारांच्या भेटीसाठी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
