दोन तासांसाठी ‘बालेकिल्ल्यात’ उपस्थिती
सुमारे तीन महिन्यांनंतर प्रकाश लोंढे सातपूर येथील आपल्या परिसरात अवघ्या दोन तासांसाठी परतल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती. काकू भिकूबाई लोंढे यांच्या निधनामुळे अंत्यविधीसाठी न्यायालयीन परवानगी घेऊन मंगळवारी रात्री पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात लोंढेला सातपूरमध्ये आणण्यात आले होते. अंत्यसंस्कारानंतर काही काळ तो आपल्या समर्थकांमध्ये दिसल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.
advertisement
गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेले नाव
नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या ‘कायद्याचा बालेकिल्ला’ या मोहिमेतील प्रमुख कारवाईत प्रकाश लोंढे आणि त्याच्या टोळीला सर्वप्रथम अटक करण्यात आली होती. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयटीआय सिग्नल परिसरातील बारबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणासह विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये लोंढे, त्याचे दोन्ही मुले आणि टोळीतील सदस्य सध्या कारागृहात आहेत. या पार्श्वभूमीवरही लोंढेने महापालिका निवडणूक लढविल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली होती.
न्यायालयीन परवानगीने निवडणूक रिंगणात
न्यायालयीन परवानगीने प्रकाश लोंढेने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कडून तो अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होता. दरम्यान, काकूंच्या निधनामुळे त्याला अंत्यसंस्कारासाठी तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार रात्री साडेनऊच्या सुमारास तो पोलिसांच्या सुरक्षाकवचात सातपूर अमरधाम येथे पोहोचला.
‘संयम पाळा, आपल्याला लढायचंय’ लोंढेनी केलं होतं आवाहन
लोंढे सातपूरमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या वाहनाभोवती समर्थकांनी गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अंत्यसंस्कारानंतर भावनिक होत लोंढेने उपस्थितांना उद्देशून, “संयम ठेवा, नियम पाळा. हात जोडून विनंती करतो, शांतता राखा. माझ्या कुटुंबाला सांगतो, आता रडू नका. कारण आपल्याला लढायचंय,” असे आवाहन केले होते.
या संपूर्ण घटनेमुळे प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक निकालाबरोबरच प्रकाश लोंढेची भूमिका आणि त्याचा राजकीय प्रभाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
