महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकमधील इगतपुरीत दोन दिवसांचे शिबीर होते. या शिबिराला राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर यांना मात्र पक्षाकडून कोणतेही निमंत्रण देण्यात आले नव्हते. पक्षाच्या निर्णयावर दोघांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
पक्ष मला असे वागवत असेल तर मी कोणत्या तोंडाने पक्षाची बाजू मांडू?
advertisement
आता बस्स झालं... मी देव बदलणार नाही.. माझी भक्ती असेल तर देव मला बोलवेन. तोपर्यंत मी देवळात जाणार नाही, असे प्रकाश महाजन सूचकपणे म्हणाले. जर घरातच मान नसेल तर जग काय आम्हाला मान सन्मान देणार? अशा पद्धतीने पक्ष मला वागवत असेल तर मी कोणत्या तोंडाने पक्षाची बाजू मांडू? असा उद्विग्न सवाल त्यांनी डोळ्यांत पाणी आणून विचारला. जगात करण्यासारखे खूप काही आहे... दुसरे काहीतरी करेन, असे प्रकाश महाजन म्हणाले.
आता देवाने बोलविल्याशिवाय मी देवळात जाणार नाही
पक्षाच्या निष्कर्षात प्रवक्त्यांना शिबिराला बोलवायचे नाही, असे असल्याने मला बोलविण्यात आले नाही. त्यांच्या निर्णयावर मी नाराज नाही. मी माझ्यावरच नाराज आहे. घरच्या लोकांना पण तोंड दाखवायला जागा राहिली नाही. पक्षाचे शिबिर आहे आणि मीच तिथे नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे. आता देवाने बोलविल्याशिवाय मी देवळात जाणार नाही, असे प्रकाश महाजन म्हणाले.
दोन भावांच्या एकत्रित येण्याचा आग्रह धरला, त्याची मी क्षमा मागितलीये
आपले भांडण ज्यावेळी नशिबाशी असते त्यावेळी माणसाची हार होतेच. माझे नेमके काय चुकले, हे मला माहिती नाही. पण दोन भावांच्या एकत्रित येण्याचा आग्रह धरला त्याची क्षमा मी पक्षनेत्यांजवळ मागितली आहे, असेही महाजन यांनी सांगितले.