Pune Crime: पुण्यात अल्पवयीन पोरांच्या हातात कोयता येतो कुठून? सांस्कृतिक शहराचं भयानक वास्तव
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Crime: पुणे शहरातील गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सामाजिक हितासाठी ही बाब चिंताजनक आहे.
पुणे : शहरात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचं स्वरुप बदलताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मोबाईल, महागडे गॅझेट्स, चैनीच्या वस्तूंची आवड, नशेचं व्यसन, इंटरनेटचा चुकीचा प्रभाव आणि मित्रांच्या दबावामुळे अनेक मुलं गुन्हेगारीच्या मार्गावर जात आहेत. पोलिसांच्या आकडेवारीतही वाहनचोरी, घरफोडी, दरोडे आणि अमली पदार्थांच्या व्यवहारात अल्पवयीन टोळ्यांचा सहभाग स्पष्टपणे दिसून येतो.
सामाजिक तज्ज्ञांच्या मते, या प्रवृत्तीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पालकांचा तुटणारा संवाद. आई-वडील आपल्या मुलांशी कमी बोलतात, त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे, याची त्यांना कल्पना नसते. त्याचबरोबर चुकीचे रोल मॉडेल्सही मुलांवर परिणाम करतात. पूर्वी शाळेत खेळांना महत्त्व दिलं जात होतं, त्यामुळे मुलांची उर्जा योग्य मार्गाने वापरली जात होती. मात्र, आता मैदानी खेळ कमी झाले असून तीच ऊर्जा इतर चुकीच्या गोष्टींमध्ये खर्च होते.
advertisement
सोशल मीडिया, चित्रपट आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेली हिंसात्मक दृश्येही या प्रवृत्तीला खतपाणी घालतात. काहीवेळा मुलांना राजकीय आंदोलनं किंवा आरक्षणाच्या नावाखाली हिंसक घडामोडींमध्ये सहभागी होणे, हे गौरवाचं काम वाटू लागतं. त्यातून गुन्ह्याचं रोमँटिसायझेशन होऊन मुलं चुकीच्या वाटेवर जातात. यामध्ये व्यसन हा देखील एक महत्त्वाचा घटक ठरतो. सुरुवातीला कुतूहल म्हणून घेतलेले ड्रग्ज, सिगारेट किंवा दारू हळूहळू सवयीमध्ये रुपांतरित होतात आणि पैशांची गरज भागवण्यासाठी गुन्हे केले जातात.
advertisement
या सगळ्या परिस्थितीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत. सामाजिक तज्ज्ञ सांगतात की, मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. ट्रेकिंग, वाचन, क्रीडा स्पर्धा किंवा सामाजिक संस्थेत काम करणे, यामुळं मुलांची उर्जा सकारात्मक मार्गाने वापरली जाते. त्यातून शिस्त, टीमवर्क आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव मुलांमध्ये निर्माण होते.
बाल न्याय कायदा आणि त्यातील पळवाट
बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायद्यानुसार 18 वर्षाखालील मुलाने गुन्हा केला तर त्याला प्रौढ गुन्हेगाराप्रमाणे शिक्षा दिली जात नाही. अशा मुलाला काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, असं मानलं जातं. न्यायालय त्याला निरीक्षण गृहात पाठवतं किंवा समुपदेशनाची (काउंसलिंग) सोय करून दिली जाते. जर पालक किंवा कुटुंब त्याची जबाबदारी घ्यायला तयार नसेल तर शासन त्याचं संगोपन करते.
advertisement
यामुळे गुन्हेगार टोळ्यांना अल्पवयीन मुलांचा वापर करणे सोयीचं वाटतं. प्रौढांना जास्त शिक्षा होतात याउलट अल्पवयीन मुलांना कमी परिणाम भोगावे लागतात. बाल गुन्हेगारीच्या समस्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे यांचं म्हणणं आहे की, अल्पवयीन मुलांना गुन्ह्यात ओढणं ही एक गंभीर बाब आहे. त्यांना फक्त शिक्षा करून उपयोग नाही तर योग्य समुपदेशन, कौटुंबिक आधार आणि सकारात्मक मार्गदर्शनाची गरज आहे.
advertisement
पुण्यासारख्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहरात वाढणारी बाल गुन्हेगारी ही समाजासाठी चिंतेची बाब आहे. पालकांचा संवाद, शैक्षणिक संस्था, समाज आणि शासन यांनी एकत्रितपणे काम केलं तर या प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवता येईल. अन्यथा उद्याचा समाज ठरणारी आजची मुलं हातातून निसटू शकतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 12, 2025 4:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Crime: पुण्यात अल्पवयीन पोरांच्या हातात कोयता येतो कुठून? सांस्कृतिक शहराचं भयानक वास्तव