धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिले. वाळू माफिया, खंडणी गोळा करणाऱ्यांना त्यांचे पाठबळ होते. वाल्मिक कराड हा खुनाचा कट रचण्यामध्ये होता तर राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष सुध्दा खंडणी गोळा करण्यामध्ये होता. हे सगळे त्यांच्या कारकीर्दीत झाले, खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्याची बदनामी त्यांनीच केली, असा पलटवार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला.
advertisement
जिल्ह्यातील प्रकरणे आणि देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा विश्वासू माणूस वाल्मिक कराड हाच सूत्रधार निघाल्याने धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आम्ही बीड जिल्ह्याची बदनामी केली नाही. आम्ही वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले. त्यात कुठल्याही जाती जमातीला दोषी धरले नाही, ही गुंडगिरी होती, अवैध धंदे होते त्यावर आम्ही आवाज उठवला, असे प्रकाश सोळंके म्हणाले.
धनंजय मुंडे नेमके काय म्हणाले होते?
मागच्या प्रकरणात बीड जिल्ह्याची बदनामी जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांनी केली. आपलेही नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात पोटापाण्यासाठी काम करतात या गोष्टी कदाचित त्यांच्या लक्षात आल्या नाहीत. मृत डॉक्टरला तू बीडची आहेस, तुमच्या बीडमधील लोक कसे गुन्हेगार असतात, यावरून तिला त्रास देण्यात आला. आज त्या पुढाऱ्यांनी विचार करावा, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सुरेश धस, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंके यांच्यावर निशाणा साधला.
