मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्याच्या DRI विभागाच्या पथकाने पाचुकतेवाडी परिसरातील एका शेडवर छापा टाकून तो शेड सील केला आहे. या शेडमध्ये अमली पदार्थांची निर्मिती केली जात असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी ड्रग्स किंवा अन्य अमली पदार्थ तयार केले जात होते का? याबाबत सातारा जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
advertisement
कराडमध्ये कारवाई पण जिल्हा पोलिसांना काहीच माहिती नाही
विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईबाबत सातारा जिल्हा पोलीस तसेच कराड पोलीस अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र या छाप्यात नेमके कोणते अमली पदार्थ तयार केले जात होते, किती प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले, तसेच या प्रकरणात किती जणांना ताब्यात घेण्यात आले, याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही.
गेल्या महिन्यात सावरी गावात कारवाई, राज्यात चर्चा
अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात गेल्या महिन्यात अमली पदार्थांवर मोठी कारवाई करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावापासून काही किलोमीटर अंतरावर ही कारवाई झाली होती. तसेच या प्रकरणाशी एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांचा संबंध असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता.
जिल्ह्यातील ड्रग्ज नेटवर्क चर्चेच्या केंद्रस्थानी, स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
एका महिन्यात सावरीपाठोपाठ पाचुकतेवाडी येथे मोठी कारवाई झाल्याने सातारा जिल्ह्यातील ड्रग्स नेटवर्क पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईबाबत पुण्याच्या DRI विभागाकडूनच अधिकृत माहिती अद्याप समोर येऊ शकलेले नाही. मात्र कारवाईसंदर्भाक विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पाचुकतेवाडीतील या कारवाईने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.
