इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात आतापर्यंत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 52 जणांना वाचवण्यात यश आले.
या दुर्घटनेचा एक थरारक फोटो सध्या समोर आला असून, त्यात पूल कोसळतानाचा क्षण स्पष्टपणे टिपलेला आहे. या फोटोत पुलावर प्रचंड गर्दी दिसून येत असून, अनेक नागरिक एकाच वेळी पुलावर असल्यानेच हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पूलावर पाय ठेवायला देखील जागा नसल्याचा प्राथमिक अंदाज या फोटोवरून बांधण्यात येत आहे. या गर्दीमुळेच लोकांना मागे अथवा पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला होता.
advertisement
सुट्टीच्या दिवसामुळे होती मोठी गर्दी...
रविवारी सुट्टी असल्यामुळे कुंडमळा परिसरात सहलीसाठी आलेल्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. 100 ते 150 पर्यटक एकाच वेळी पुलावर असल्याचे सांगितले जात आहे. पुलावर गर्दी वाढत असताना, अचानक मध्यभागी पूल तुटून कोसळला आणि अनेक पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून गेले. एवढ्या प्रमाणावर पुलावर पर्यटकांची गर्दी झाली तरी प्रशासनाकडून त्यांना हटकण्यासाठी, गर्दीवरील नियंत्रणासाठी कोणी का नव्हते, असा सवाल उपस्थित होत आहे.
दुर्घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. काही स्थानिक युवकांनी प्रसंगावधान राखत नदीत उड्या टाकून अनेकांचे प्राण वाचवले. तत्काळ तळेगाव पोलीस, अग्निशमन दल, वन विभाग, एनडीआरएफ यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचाव कार्य रात्रभर सुरू होते. अखेर आज पहाटेच्या सुमारास एनडीआरएफ कडून बचाव कार्य थांबवण्यात आले.
