पुण्याचे वैभव शनिवारवाडा ऐतिहासिक वारसा स्थळ आहे की गैर हिंदू प्रार्थना स्थळ आहे? असा सवाल विचारताना सार्वजनिक ठिकाणी विशेषत: वारसा स्थळी मुलींनी नमाज पठण केल्याच्या कृतीवर खासदार मेधा कुलकर्णी यांनी टीका केली आहे.
मेधा कुलकर्णी यांच्या या पोस्टनंतर समाज माध्यमांवर चित्रफित वेगाने पसरली झाली असून, चित्रफित नेमकी कधी चित्रित केली याबद्दलची माहिती समोर येऊ शकलेली नाही. किंबहुना पोलिसांकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
advertisement
मेधा कुलकर्णी यांचा आरोप काय?
ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ? सारसबाग येथे झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर शनिवार वाड्यात घडलेला प्रकार हा प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय आहे. पुणे प्रशासन नक्की करते काय? आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय? शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज आता जागृत झाला आहे, असे मेधा कुलकर्णी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला असून आज शनिवारवाड्यासमोर सामूहिक ‘शिव वंदना’ करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
शनिवारवाडा हा पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक मानला जातो. अशा ठिकाणी धार्मिक प्रार्थना झाल्याची चित्रफित समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांकडून या चित्रफितीची सत्यता तपासली जाणार आहे.