हवामान तज्ज्ञ शशिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियाकडून भारताच्या दिशेनं 24 नोव्हेंबर रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होईल असा प्राथमिक अंदाज आहे. दक्षिण अंदमान समुद्रातमध्ये डिप्रेशन तयार झालं आहे. तर दुसरं दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये २५ नोव्हेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून दक्षिण भारतात 25 ते 3 डिसेंबर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान झालं असून थंडी गायब झाली आहे.
advertisement
गुलाबी थंडी गायब झाली असून पुन्हा दिवसा उकाडा वाढला आहे. दमट आणि उष्ण हवामानामुळे लोक हैराण झाली आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींचा पाऊस 5 डिसेंबरपर्यंत मधून मधून पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कुठेही मुसळधार किंवा अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात तरी देण्यात आलेला नाही.
ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून साधारणपणे 5 डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रावर दोन वादळांमुळे होणाऱ्या हवामानातील बदलाचा परिणाम होत आहे.
उत्तर महाराष्ट्राला थंडीने अक्षरशः गारठले होते. परंतु राज्यातील ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील. विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमाना वाढ झाली असली तर किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात देखील किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे गारठा कमी होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नागपूरमध्ये 25 नोव्हेंबर रोजी कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे.दरम्यान, मागील आठवड्यात राज्यातील सर्वच भागात कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली. ढगाळ वातावरण तयार झाल्याने गारठा कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
