मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू कोअर कमिटीचे सदस्य आणि माजी नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तांडेल यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
पक्षात गुदमरतोय...तांडेल यांनी व्यक्त केली खंत
गेल्या अनेक वर्षांपासून मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विरेंद्र तांडेल यांनी राजीनामा देताना गंभीर आरोप केले आहेत. पक्षात गेल्या काही काळापासून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये किंवा संघटनात्मक प्रक्रियेत सामावून घेतले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. "अशा परिस्थितीत स्वाभिमान गहाण ठेवून काम करणे आता शक्य नाही," असे सांगत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
advertisement
स्थानिक कुरघोडी ठरली कारणीभूत?
तांडेल यांच्या राजीनाम्यामागे केवळ अपमानास्पद वागणूकच नाही, तर पक्षांतर्गत होणाऱ्या कुरघोडी हे देखील मुख्य कारण असल्याचे समजते. स्थानिक पातळीवरील काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक डावलले जात असल्याने तांडेल नाराज होते. वारंवार या तक्रारी करूनही वरिष्ठ पातळीवरून त्याची दखल घेतली गेली नसल्याचे सूत्रांकडून समजते.
अमित ठाकरेंच्या कोअर कमिटीतले सदस्य...
माजी नगरसेवक असलेले विरेंद्र तांडेल असलेले मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या कोअर कमिटीचे सक्रिय सदस्य होते. तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत तांडेल यांनी पक्ष सोडल्यामुळे मुंबईतील मनसेच्या संघटनात्मक बांधणीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
