संयुक्त सभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाकरेंची सेना आणि मनसेने जोरदार तयारी केली आहे. दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांवर विशेष जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत. सभेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सभेला कोणत्याही पक्षाचे लेबल लागू नये, याकरिता मनसेने मनसैनिकांना विशेष सूचना केल्या आहेत.
जल्लोष मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंकडून प्रत्येक मनसैनिकांना आदेश
advertisement
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ५ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याला आपण पक्षाचा झेंडा, स्कार्फ, बिल्ला, पक्षचिन्ह असलेले प्लाकार्ड तसेच फलक, बॅनर किंवा होर्डिंगवर पक्षाचे नाव आणि झेंडा लावू नये किंबहुना आणू नये. प्रभागात लावण्यात आलेल्या फलकांवरही पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरू नये. दिलेल्या सूचनांचे आपण पालन करावे. ह्या मेळाव्याला कोणताही झेंडा नको फक्त मराठीचा अजेंडा असू दे.
ठाकरे बंधूंचे सूर जुळले
मराठी माणसांच्या हितासाठी आमच्यातले क्षुल्लक आणि किरकोळ वाद संपवायला तयार आहोत, असे विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी करून उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यायला तयार असल्याचे थेटपणे संकेत दिले. गेली महिना दोन महिने ठाकरे बंधुंच्या युतीच्या केवळ चर्चा होत असताना त्यासाठीचे पाऊल थेटपणे उचलले जात नव्हते. अखेर हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेनेचे सूर जुळाले असून ५ तारखेच्या जल्लोष सभेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तब्बल १८ वर्षांनंतर एकाच मंचावर येणार आहेत.