उद्धव आणि राज यांच्या मनोमिलनाचे दृश्य पाहून अनेकांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीसाठी सकारात्मक ग्राऊंड तयार झाल्याचे म्हटले. नेते, कार्यकर्ते सगळ्यांच्या बोलण्या-वागण्यातून त्याची झलकही दिसू लागली. पण त्याला २४ तासही उलटले नाही तोच राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना एक सूचना केली आणि सूचनेमुळे युतीबाबत संभ्रमाचे धुके निर्माण झाले.
advertisement
मनसेचे नेते आणि प्रवक्त्यांना शिवसेना आणि मनसेच्या संभाव्य युतीविषयी बोलण्यास राज ठाकरेंनी सक्त मनाई केलीय. प्रमुख माध्यमे आणि सोशल मीडियात युतीबदद्ल व्यक्त होण्याआधी आता नेते प्रवक्त्यांना राज ठाकरेंची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे आता अनेक तर्क वितर्क लढवणं सुरू झाले आहे.
युतीबाबत विचार करायला वेळ हवाय
राज यांच्या या नव्या आदेशानंतर मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येण्यावरुन असलेला संभ्रम स्पष्टपणे दिसतो. विजयी मेळाव्याचा जल्लोष ओसरण्याच्या आतच राज यांनी हा आदेश का दिला असावा याविषयीचे अंदाज बांधले जाऊ लागलेत. याचा सरळ अर्थ म्हणजे राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या सेनेशी युतीबाबत विचार करायला वेळ हवाय. युतीच्या चर्चेची आणि निर्णयाची सगळी सूत्र राज यांना स्वतःकडेच ठेवायची तर नाही ना? युतीच्या चर्चांमध्ये केवळ नात्यांचा भावनिक विचार न करता राज ठाकरे राजकीय दृष्टीनं विचार करण्याची दाट शक्यता आहे.
युतीत अधिकाधिक राजकीय फायदा पदरात पाडून घेण्याची राज ठाकरेंची ही स्ट्रटर्जी असू शकते. आधीच्या युतीबद्दलच्या कटू अनुभवांवरुन राज ठाकरे ताकही फुंकून पितायेत. राज ठाकरे आपली बार्गेनिंग पॉवर तर वाढवत नाही ना? अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज ठाकरेंनी जरी सावध भूमिका घेतलेली असली तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना या युतीबदद्ल कमालीची उत्सुक आहे. त्याचे संकेत स्वतः उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्याच्या भाषणातही दिसले होते.
ठाकरे बंधूंची युती होणार का? सस्पेन्स कायम
राज ठाकरेंनी विजयी मेळाव्यात केलेल्या भाषणात युतीचा थेट उल्लेख नसला तरी त्यांची काही विधानं लक्षवेधी होती. तर भाषण संपवताना राज ठाकरेंनी केलेल्या उल्लेखाला अनेकांनी युतीचे संकेत मानले. सध्या तरी मनसे-शिवसेना संभाव्य युतीवर एकीकडे राज ठाकरेंची आस्ते कदम भूमिका आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकल्याचं चित्र आहे. त्यामुळे राजकीय मंचावर एकत्र आलेले हे ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का याविषयीचा सस्पेन्स कायम आहे.