महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय कुटुंबात अर्थात ठाकरे कुटुंबात. आज मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधली दोन दशकांची दिवार कोसळून पडली. मेरे पास क्या है पासून सुरु झालेला संघर्ष, 'मेरे पास मेरा भाई है' इथपर्यंत पोहोचलाय. ठाकरे बंधू एकत्र येणार का? या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला त्यांनी एकत्र येवून दिलं. दोन दशकांचा दुरावा एका गळाभेटीनं दूर झाला. ठाकरे मराठीसाठी एकत्र आले आणि पुढेही एकत्र राहू असं सांगून गेले.
advertisement
राजकीय उलथापालथींनी सतत धगधगणाऱ्या महाराष्ट्राला दोन भावांची भेट सुखावून गेली. ज्या ठाकरेंच्या एका आदेशावर वाट्टेल ते करायला तयार असलेल्या मराठी माणसाच्या मनात कुटुंबातील भाऊबंदकीची सल होती. ती आज संपली. पण शेवटी हे राजकारण आहे. जिथं फक्त भावना नसते. तिथं गणित असतं... रसायनशास्त्र असतं... भौतिकशास्र असतं... आणि असतो बुद्धीबळाचा पट. त्या पटावर ठाकरेंनी बलाढ्य महायुतीला आव्हान दिलंय. त्यात अनेक खेळ्या खेळल्या जातील. त्यामुळे ठाकरेंच्या आव्हानाचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहेत.
महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांच्या मनातली इच्छा शनिवारी पूर्ण झाली.. तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले..त्यामुळं आता मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंची झालेली एकी ही राजकीय युतीची नांदी ठरणार का? ठाकरेंची ही एकी कुणाला आव्हान ठरणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायेत.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंद होणारी ही भेट.. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ, पण या दोन भावांच्या राजकीय भेटीला 19 वर्षे उलटावी लागली.. वांद्र्यातील मातोश्री आणि दादरमधील शिवतीर्थ हे 5 किलोमीटरचं अंतर शनिवारी मिटलं.. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं अखेर मराठीच्या मुद्द्यावर मलोमिलन झालं.. या बहुप्रतिक्षीत बंधूभेटीचे साक्षीदार होण्यासाठी हजारो मराठीप्रेमींनी वरळीच्या NSCI डोममध्ये गर्दी केली.
सरकारच्या त्रिभाषा सुत्राविरोधात एल्गार पुकारणाऱ्या ठाकरे बंधूंच्या रेट्यानं सरकारनं त्रिभाषेचा दोन्ही जीआर रद्द केले..याचाच विजयी जल्लोष करत ठाकरेंनी बंधूंनी एकत्र येत, 'ठाकरे ब्रँड'नारा बुलंद केला. सरकारच्या हिंदी धोरणावर प्रहार करत, राज आणि उद्धव ठाकरेंनी सरकार टीकेचे कोरडे ओढले. तर उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर कडाडून टीका केली. तब्बल 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मराठीच्या प्रश्नावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले.. एकत्र येताना दोघा भावांनी फडणवीसांना चिमटे काढल्याचं पाहायला मिळाले.
सरकारनं त्रिभाषा भाषेचा जीआर केल्यामुळं ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा रद्द झाला.. पण, विजयी जल्लोष मेळाव्यात दोघे भाऊ एकत्र आलेच.. पण, फक्त आताच नव्हे तर भविष्यातही एकत्र राहण्याचे स्पष्ट संकेत दोन्ही भावांनी दिले.
तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे राजकीय दृष्ट्या एकत्र आल्यानं ठाकरे ब्रँडला उभारी मिळाल्याचं पाहायला मिळालं..बाळासाहेबांच्या समक्ष जे घडलं नाही, ते घडल्यानं लाखो शिवसैनिकांची इच्छा पूर्ण झाली.या एकीनं शिवसैनिक आणि मनसैनिकांसह मराठी प्रेमींमध्ये उत्साह संचारलाय. पण, मराठीच्या मुद्द्यावर झालेली ही एकजूट आता राजकीय युतीत परावर्तीत होणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.. ठाकरेंमध्ये राजकीय एकी झाली, तर आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांसाठी हे एक मोठं आव्हान असेल, यात शंका नाही.