अनगर नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार होती. त्यासाठी राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या सरस्वती शिंदे यांनी आक्षेप नोंदविल्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला. अर्ज माघारीच्या दिवशी शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्याने प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मंगळवारी सायंकाळी पाटील यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी बाळराजे पाटील यांनी अजित पवार यांचे नाव घेऊन त्यांना आव्हान दिले. मात्र राष्ट्रवादीने राजन पाटील आणि त्यांच्या चिरंजीवांना जोरदार उत्तर दिल्याने अखेर राजन मालकांवर माफी मागण्याची वेळ आली.
advertisement
राजन पाटील यांनी अजित पवार यांची माफी मागितली
तरुण मुलं थोडी उत्साह असतात. उत्साहाच्या भरात त्याने वक्तव्य केले. माझ्या दृष्टीने तो राजकारणातील लहान व्यक्ती आहे. त्याच्या तोंडून नकळत शब्द गेले. त्याचे अजिबात समर्थन होणार नाही. पाटील परिवाराच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. अजित पवार यांनी पार्थ आणि जय समजून बाळराजे यांना आपल्या पदरात घ्यावे, असे राजन पाटील म्हणाले.
आम्ही जे वैभव उभे केले त्यात शरद पवार आणि अजित पवार यांचा सिंहाचा वाटा
आज जरी आम्ही शरद पवार यांच्यापासून दूर गेलेलो असतो तरी त्याला अजित पवार हे कारण आहे, असे आम्ही म्हणणार नाही. त्याला अनेक कारणे आहेत. आतापर्यंत आम्ही जे वैभव उभे केले, त्यात मोठे साहेब आणि अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. मी अंत:करणापासून अजित पवार आणि पवार परिवाराची माफी मागतो, असे राजन पाटील म्हणाले.
बिनविरोध निवडणुकीची गावाला परंपरा पण...
निवडणूक लागली तर सलोखा बिघडतो. बिनविरोध निवडणुकीची गावाला परंपरा आहे. गेल्या ५० वर्षांपासून गावात निवडणूकच झाली नाहीये. यंदाही तसाच प्रयत्न होता. मात्र काही जणांकडून नाहक निवडणुकीचे प्रयत्न झाले. त्यात त्यांना यश आले नाही, असेही राजन पाटील म्हणाले.
आम्हाला त्रास दिला, आम्ही सगळं सहन केलं, काल उत्साहाच्या भरात शब्द गेले, माफ करा- बाळराजे
उत्साहाच्या भरात तोंडातून शब्द गेले असतील. मागील पाच वर्षात अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या सोबत आम्ही काम करत होतो. म्हणून आम्ही सगळे सहन केले, परंतु सहन करण्याला पण एक मर्यादा असते. नगर पंचायत बिनविरोध होऊ नये म्हणून काहींनी प्रयत्न केले. परंतु निसर्गाने देखील त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. माझ्या तोंडून काल काही शब्द गेले. त्याबद्दल मी अजित पवार यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्टीकरण बाळराजे पाटील यांनी वादावर दिले.
अनगर गावात प्राजक्ता पाटील यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली
अनगर नगरपंचायत निवडणुकीत बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्राजक्ता पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर दुसऱ्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला. राजन पाटील यांच्या मातोश्री बंगल्यासमोरून प्राजक्ता पाटील यांची मिरवणूक निघाली. अनगर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून प्राजक्ता पाटील यांनी गावाचे आभार मानले.
