राजन साळवी यांनी ठाण्यातील आनंदाश्रमात शिंदेसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला शिवसेना नेते मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदार मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे आदी नेते उपस्थित होते.
एका डोळ्यात हसू... दुसऱ्या डोळ्यात आसू
राजन साळवी म्हणाले, मागे ९ तारखेला एकनाथ भाईंना भेटून मी त्यांचे आशीर्वाद घेतले. छोटा भाऊ मागे राहिला होता. तो कुटुंबासोबत येऊ इच्छितो, आम्हाला तुमच्यासोबत घ्या, असे मी भाईंना सांगितले. त्यांनी आमची इच्छा मान्य केली. आज तो सुवर्ण दिन आला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आनंदाश्रमाची भूमी आहे. इथेच भाईंचे नेतृत्व घडले. २००० साली मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झालो. त्यावेळी गुरुवर्य दिघेंनी मला सन्मानित केले. आज याच भूमीत भाईंनी मला सन्मानित केले. आज दोन्ही डोळ्यात अश्रू आहेत. एका डोळ्यात आनंदाश्रू आहेत तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आहेत. ज्या पक्षाने मला नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनेते, आमदार केले, तो पक्ष मला सोडावा लागला. त्यामुळे मला दु:ख होतंय पण वाट चुकलेला माणूस पुन्हा कुटुंबात आला. भाईंनी मला पक्षात घेतले, याचा आनंदही होतोय, असे राजन साळवी म्हणाले.
advertisement
राजन साळवी यांनी विनायक राऊत यांच्यावर पक्ष सोडण्याचं खापर फोडलं
शिंदे मुख्यमंत्री होत असताना मी त्यांच्यासोबत जाऊ शकलो नाही, याचे मला दु:ख वाटते. २००६ साली पोटनिवडणुकीत माझा पराभव झाला पण नंतर २००९, २०१४ आणि २०१९ ला मी निवडून आलो. २०१४ ला सेना-भाजपची सत्ता आली. युतीच्या सरकारमध्ये मी मंत्री होईल, असे वाटत होते. शिंदेसाहेबांनी माझी उद्धवसाहेबांकडे शिफारस केली पण दुर्दैवाने मी मंत्री झालो नाही. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी त्यावेळी दीपक केसरकर यांना मंत्री केले. राजन साळवी तिथेच राहिले. २०१९ ला मी मंत्री होईल, असे पुन्हा वाटले. पण उदय सामंत सेनेत आले आणि ते मंत्री झाले. आता लोकसभेच्या विजयानंतर मविआची सत्ता येऊन माझं मंत्रिपद नक्की, असे मला वाटले. पण आमचे सरकारच आले नाही. नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं.
२०२४ चा पराभव आम्हा सगळ्यांच्या जिव्हारी लागला. निवडणुकीत हारजीत होत असते. शिवसेना नेते विनायक राऊत यांना आम्ही मोठे केले. त्यांना आम्ही दोन वेळा खासदार केले. पण त्यांनी यावेळी माझ्याविरोधात काम केले. माझ्याविरोधात उभे असलेल्या किरण भैय्या सामंत यांना विनायक राऊत यांनी आतून मदत केली. भैय्या खासगीत कबुल करतील. कुटुंबातील एका व्यक्तीची वाट चुकली होती, आज तो व्यक्ती कुटुंबात परत आलाय. भाईंनी आज कुटुंबात घेतले. दुधात साखर पडावी, तसे आम्ही सगळे कुटुंबात परत आलो आहोत.
