भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पाचुंदकर दीर-भावजयने पक्षप्रवेश केला. यावेळी शेखर पाचुंदकर यांनी नाव न घेता दिलीप वळसे पाटील यांना जोरदार लक्ष्य केले. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर पाचुंदकर यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपची पुणे जिल्ह्यात ताकद वाढणार आहे.
पाचुंदकर यांच्यावर आरोप असलेला जमीन घोटाळा काय?
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हद्दीतील करोडो रुपये किमतीची सुमारे ७२ गुंठे शासकीय जमीन ग्रामपंचायत दप्तरात फेरफार करून आनंदराव पाचुंदकर यांच्या नावावर केल्याचे विविध शासकीय अहवालातून आणि कोर्टाच्या निर्णयातून सिद्ध झाले होते. सन २००९ ते २०१९ या कालावधीत हा सर्व अपहार झाला असून यादरम्यान २०१३ ते २०१७ या कालावधीत रांजणगावच्या सरपंच असणाऱ्या स्वाती पाचुंदकर यांच्या काळात हा अपहार झाल्याचे उच्च न्यायालयाच्या निकालात म्हटले आहे.
advertisement
या संपूर्ण प्रकरणात रांजणगाव ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी करणारे शिरूर तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे यांनी याबाबत तत्कालीन सरपंच स्वाती पाचुंदकर यांचे सह अजून एक महिला सरपंच, तीन ग्रामसेवक आणि एका लिपिकावर ठपका ठेवत रांजणगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. गावडे यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलिसांनी या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवक हनुमंत चव्हाण यांना आणि लिपीक संतोष शिंदे यांना अटक केली. सध्या ते जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.
सन १९६० - ६१ व सन २००८ - ०९ च्या रजिस्टर मधे फेरफार करून, खाडाखोड करून, नवीन पान चिकटवून, अतिरिक्त व अनियमीत नोंदी करून गावठाणातील ७२ गुंठे जागेवर आनंदराव दिनकर पाचुंदकर यांचे नाव नोंदविले होते. आनंदराव पाचुंदकर हे तत्कालीन सरपंच स्वाती पाचुंदकर यांचे सासरे असून, या गुन्ह्यात नुकतेच नाव समाविष्ट केलेल्या दत्तात्रेय पाचुंदकर यांचे वडील आहेत.