मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक इरफान खान हे नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन कोंडिवरेहून आरवलीच्या दिशेने जात होते. त्यावेळी एक मुलगी आरवलीच्या दिशेनं रस्त्याने धावत चालली होती. यावेळी इरफान खान यांनी आपली रिक्षा थांबवून तिला हटकले. का धावत आहेस? असं विचारलं. त्यावेळी आपल्याला कोणीतरी पळवून आणलेले आहे, असे सांगून ती रडू लागली.
ही बाब रिक्षा चालक इरफान खान यांना समजताच, त्यांनी तातडीने माखजन पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांच्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतले व कर्नाटकातील पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता या मुलीने आपण कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील असल्याचं सांगितलं. आपण अकरावी कॉमर्समध्ये कागलच्या कॉलेजमध्ये शिकत असल्याची माहितीही तिने दिली.
advertisement
२० सप्टेंबर रोजी कागल बस स्टँडवर माझ्या वर्गमित्राने मला हत्याराचा धाक दाखवून एसटी बसने पंढरपूरला नेले. माझ्याकडील मोबाईल फोडून सीम तोडून टाकले. त्याने शस्त्राचा धाक दाखवून पंढरपूर येथे आणलं. त्यानंतर मुंबई दादर येथे नेलं. तेथून परत पंढरपूर, कराड आणि चार दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड या ठिकाणी आणलं. यादरम्यान तरुणाने आपल्यावर बळजबरी करून ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे तिने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.