राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे या पुलाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. या प्रकल्पासाठी सरकारने तब्बल ८०० कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. एवढा प्रचंड निधी उपलब्ध असूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने स्थानिक नागरिक आणि कोकणवासियांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जनतेच्या सोयीसाठी आणि विकासाला गती देण्यासाठी असलेली ही योजना फक्त घोषणाच ठरत आहे की काय, अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत.
advertisement
केवळ दाभोळ खाडीवरील पूलच नव्हे, तर दाभोळ, जयगड आणि बाणकोट अशा तीन महत्त्वाच्या खाड्यांवरील पुलांचे काम लांबणीवर गेले आहे. या पुलांच्या उभारणीत होणाऱ्या विलंबामुळे सागरी महामार्गाचे मूळ महत्त्वच कमी होत चालले आहे. एका बाजूला मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे, पण सागरी मार्ग पूर्णत्वास न गेल्यामुळे कोकणातील अंतर्गत वाहतुकीला आणि पर्यटनाला अपेक्षित असलेला वेग मिळत नाहीये.
हा सागरी महामार्ग पूर्ण झाल्यास किनारपट्टीवरील अनेक गावे एकमेकांना जोडली जातील, ज्यामुळे नागरिकांचा प्रवास वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल. तसेच, गोव्याला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाला एक सुंदर आणि पर्यायी रस्ता उपलब्ध होईल. हा रस्ता थेट किनारपट्टीला समांतर असल्याने पर्यटन उद्योगात मोठी भरारी घेण्याची क्षमता कोकणात आहे.
कोकणातील विकासाला गती देणारा, पर्यटनाला चालना देणारा आणि नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुलभ करणारा हा महत्त्वाकांक्षी पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा, हीच आता कोकणवासीयांची सर्वात मोठी अपेक्षा आहे. सरकारने आणि प्रशासनाने तातडीने या प्रकल्पातील अडचणी दूर करून कामाला सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.