कराड : मोबाईलचा कॅमेरा खराब झाला होता, तो दुकानात दुरुस्त करण्यासाठी गेला पण दुकानादारासोबत झालेल्या वादातून मित्राचा मृत्यू झाला. या घटनेचं मित्राला प्रचंड दु:ख झालं. ४ महिने प्लॅनिंग करून मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मित्राने KGF 765 पिस्तुल मागवली. पण, तो मित्राच्या मारेकऱ्यांना ठार मारणार त्याआधीच पोलिसांनी बंदूकधारी मित्राला ताब्यात घेतलं. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना साताऱ्यातील कराडमध्ये घडली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी देशी पिस्तुलासह कराड शहरात फिरत असलेल्या तरुणाच्या कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेनं ताब्यात घेतलं, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टाळला. ही कारवाई दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री करण्यात आली असून पिल्या ऊर्फ श्रेयस श्रीरंग पवार (रा. लिगाडे पाटील कॉलेज समोर, सैदापूर, ता. कराड) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कराड एस.टी. स्टँडसमोरील एस.एस. मोबाईल शॉपी इथं २० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या घटनेत अखिलेश नलवडे याचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी अजिम चांद बादशहा मुल्ला (रा. मलकापूर) यास ठार मारण्याच्या उद्देशाने अखिलेशचा मित्र पिल्या ऊर्फ श्रेयस पवार हा गजानन हौसिंग सोसायटी परिसरात पिस्तुलासह फिरत होता.
ही माहिती तात्काळ वरिष्ठांना कळवून रात्री 9 वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला. पाठलाग करून संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. झडतीदरम्यान 65 हजार रुपये किंमतीची लोखंडी थातची देशी बनावटीची पिस्तुल आणि 4 हजार रुपये किंमतीची ‘KF 765’ असे लिहिलेली दोन जिवंत काडतुसं असा एकूण 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पिल्या ऊर्फ श्रेयस पवार हा कोणताही रेकॉर्डवरचा गुन्हेगार नाही. त्याने पिस्तुल कुठून मिळाली, त्याला कुणी मदत केली आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर करीत आहेत.
20 सप्टेंबर २०२५ ला दुकानात काय घडलं?
कराड एस.टी. स्टँडसमोरील एस.एस. मोबाईल शॉपी नावाचं दुकान आहे. या दुकानातून अखिलेशने मोबाईल घेतला होता. पण तिन दिवसांमध्येच मोबाईलचा कॅमेरा खराब झाल्यामुळे अखिलेश नलवडे दुकानात गेला होता. त्यावेळी दुकानात फरशी पुसण्याचं काम सुरू होतं. अखिलेश दुकानात तसाच गेला, चप्पलीची घाण लागली म्हणून दुकानातील कर्मचारी आणि आरोपी अजिम चांद बादशहा मुल्ला याच्यासोबत वाद झाला. वादाचं रुपांतर मारामारीत झालं. यावेळी अखिलेश नलवडे हा दुकानात कोसळला होता. त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं. पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. आपल्या मित्राचा मृत्यू झाल्यामुळे पिल्या उर्फ श्रेयसने बदला घ्यायचं ठरवलं होतं.
