राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचा तालुक्यात प्रभाव असताना, पक्षासाठी सातत्याने झटणाऱ्या आणि प्रबळ इच्छुक उमेदवार असलेल्या मेघा प्रशांत भागवत यांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या ‘आयात’ उमेदवाराला उमेदवारी देण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप होत आहे. या निर्णयाविरोधात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी तडकाफडकी राजीनामा देत पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.
advertisement
या धक्कादायक घडामोडीनंतर आमदार शेळके यांचे एकेकाळचे खंदे समर्थक असलेले प्रशांत भागवत यांनी पत्नी मेघा भागवत यांच्यासह थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
परिणामी, मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घडामोड केवळ एका पदाच्या राजीनाम्यापुरती मर्यादित नसून, ती निष्ठावंत विरुद्ध आयात उमेदवार, विचारधारा विरुद्ध सत्ताकेंद्रित राजकारण या संघर्षाचे प्रतीक मानली जात आहे. “निष्ठेला किंमत उरलेली नसेल, तर पक्षात राहण्याचा अर्थ काय?” असा थेट सवाल उपस्थित करत मेघा भागवत यांनी राजीनाम्यातून पक्ष नेतृत्वाला सणसणीत टोला लगावला आहे...
ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या राजकीय उलथापालथीचा परिणाम येत्या निवडणुकांत स्पष्टपणे दिसून येणार असल्याची चर्चा मावळातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. मावळ राष्ट्रवादीत वाढती अस्वस्थता, नाराज कार्यकर्त्यांचा सूर आणि भाजपमध्ये झालेला प्रवेश, या सागळ्यामुळे तालुक्यातील राजकारणाला नवे वळण लागले आहे..
त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची ही बंडाळी उपमुख्यमंत्री अजित पवार कशी थोपवणार की आमदार सुनील शेळके यांची मनमानी कारभाराला मूक संमती देणार याकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला प्रशांत भागवत सारखा मातब्बर नेता गमवावा लागला असून त्याचा परिणाम काय होईल ते तर निवडणूक निकाल सांगेल.
